कमल हासन (संग्रहित संपादित प्रतिमा)

साऊथचा सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तब्बल 6 दशके चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कमल हासन आज 65 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 साली चेन्नईच्या परमकुडी येथे झाला. 1959 साली कमल हासन यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. महत्वाचे म्हणजे वयाच्या 6 व्या वर्षीपासून त्यांना प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. 1975 साली प्रदर्शित झालेल्या  ‘अपूर्व रागंगल’ या  चित्रपटाच्या यशानंतर त्यांना विशेष ओळख प्राप्त झाली. आपल्या 60 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये हासन यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. अशाच विविधांगी भूमिका त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातही साकारल्या. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त चला एक प्रकाश टाकूया कमल हासन यांच्या लव्ह लाईफवर.

कमल हासन यांचे पहिले लग्न वाणी गणपतिसोबत झाले. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री सारीकाशी दुसरे लग्न केले. कमलने 1978 मध्ये वाणी गणपतीशी लग्न केले आणि त्यांचे लग्न फक्त 10 वर्षे टिकले.  दोघांनीही 1988 मध्ये घटस्फोट घेतला. याच दरम्यान कमलने अभिनेत्री सारिकाला डेट करण्यास सुरवात केली. पुढे सन 1988 मध्ये त्यांनी सारिकाशी लग्न केले. सारीकासोबत कमल यांना श्रुती हासन आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत. पुढे त्यांनी सारिकासोबतही घटस्फोट घेतला. सारिकापूर्वी कमलने 70 च्या दशकाची अभिनेत्री श्रीविद्याला डेट केले होते. श्रीविद्या आणि कमलने एकत्र काही चित्रपटांमध्ये काम केले होते. पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही.

त्यानंतर कमल यांचे नाव सिमरनशी जोडले गेले. 2004 साली जेव्हा सारिकापासून त्यांचा घटस्फोट झाला, तेव्हा सिमरन आणि कमल एकत्र आले. महत्वाचे म्हणजे सिमरन आणि कमल यांच्यामध्ये तब्बल 22 वर्षांचे अंतर होते. याच गोष्टीमुळे चित्रपटसृष्टीमध्ये या नात्याची फार चर्चा झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढे सिमरनने कमल यांना सोडून आपल्या बालपणीच्या मित्राशी लग्न केले आणि कमलसोबतचे संबंध संपुष्टात आले. कमल यांचे नाव गौतमी तड़िमल्ला सोबतही जोडले गेले. असे सांगितले जाते की, कमल हासन आणि गौतमी हे जवळजवळ 13 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र इतक्या वर्षांनतर गौतमीने 2016 मध्ये कमलपासून विभक्त होण्याची घोषणा केली. अशाप्रकारे कमल आपल्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत.