'झुंड' (Jhund) या नागराज मंजुळे यांच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाचा टीझर आज रसिकांच्या भेटीला आला आहे. सैराट सिनेमानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या नागराज मंजुळेंकडून रसिकांच्या आणि सिनेसृष्टीच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. स्लम सॉकर' (Slum Soccer) एनजीओ चालवणारे सामाजिक कार्यकर्ते विकास बरसे यांच्या जीवनावर आधारित 'झुंड' सिनेमाची कहाणी आहे. यामध्ये रस्त्यांवर फूटबॉल खेळणार्या सामान्य मुलांची प्रेरणादायी कहाणी फुलणार आहे. त्याची पहिली झलक आज रीलीज करण्यात आलेल्या टीझरमध्ये पाहण्यात आली आहे. झुंड सिनेमामध्ये विजय बरसे यांच्या प्रमुख भूमिकेमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) दिसणार आहेत. Jhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर.
झुंड या सिनेमाचं पहिलं पोस्टर काल अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शेअर केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी टीझर शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी सांगितल्याप्रमाणे आज 'झुंड' सिनेमाच्या रीलीज डेटचादेखील उलगडा करण्यात आला आहे. झुंड सिनेमा 8 मे 2020 दिवशी रीलीज होणार आहे.
झुंड सिनेमाचा टीझर
झुंड सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नागराज मंजुळे यांनी सांभाळली आहे. तर संगीत दिग्दर्शन मराठमोळ्या अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. सिनेमामधील इतर कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात असली तरीही मुख्य भूमिकेमध्ये अमिताभ बच्चन दिसणार आहेत.