
अंकुश (Ankush) सिनेमातील 'इतनी शक्ती हमे देन दाता..' (Itni Shakti Hamein Dena Data) या लोकप्रिय प्रार्थनेचे गीतकार अभिलाष (Lyricist Abhilash) यांचे मुंबई मध्ये काल (27 सप्टेंबर) निधन झाले आहे. 74 वर्षीय अभिलाष यांच्यावर काही महिन्यांपूर्वी पोटाच्या आतड्यांचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान आज (28 सप्टेंबर) पहाटे 4 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांनी रविवारी गोरेगाव येथील त्यांच्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला.
मीडीया रिपोर्ट्समध्ये गीतकार अभिलाष यांच्या निधनाचे कारण कॅन्सर किंवा अन्य आजार सांगितले जात आहे. मात्र एबीपीशी बोलताना अभिलाष यांच्या पत्नीने केलेल्या खुलाश्यानुसार, त्यांना कॅन्सरचा आजार नव्हता. आतड्यांच्या ऑपरेशननंतर त्यांच्या चालण्या फिरण्यावर बंधनं आली, कमजोरी आली आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले. दरम्यान कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केवळ 15-20 जणांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार झाले. यावेळी बंगळूरू मध्ये राहणारी त्यांची मुलगी, जावई देखील या अंत्यसंस्कारांना अनुपस्थित होते.
गीतकार अभिलाष यांनी 1985 साली रचलेली अंकुश सिनेमातील प्रार्थना 'इतनी शक्ती हमे देन दाता...' विशेष गाजली. त्याचं 8 भाषांमध्ये अनुवाद देखील करण्यात आला आहे. आजही अनेक शाळांमध्ये ही प्रार्थना गायली जाते. या प्रार्थनेसोबतच अभिलाष यांनी 'सांझ भई घर आजा', 'आज की रात न जा', 'वो जो खत मुहब्बत में', 'तुम्हारी याद के सागर में' 'संसार है इक नदिया', 'तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर' ही गाणी रचली आहे. गीतकार अभिलाष यांना माजी राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंह यांच्या हस्ते कलाश्री अवार्ड देऊन गौरवण्यात आले आहे.
गीतकार अभिलाष यांचा जन्म 13 मार्च 1946 सा ली दिल्ली मध्ये झाला होता. अभिलाष यांचे वडील व्यावसायिक होते. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की अभिलाष यांनी देखील व्यवसायमध्ये हातभार लावावा. मात्र अभिलाष यांची रूची कला साहित्याकडे होती. 12 व्या वर्षापासूनच अभिलाष कविता लिहायला लागले होते. मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर ते कार्यक्रम सादर करायला लागले. त्यांचं मूळ नाव ओम प्रकाश होते. ओमप्रकाश' अज़ीज़ च्या नावाने ते गझल, नज्म आणि कथा लिहायला लागले होते.