अतिरिक्त कमाईसाठी IRCTC नामी योजना; स्पेशल ट्रेन्सद्वारे होणार चित्रपटांचे प्रमोशन, Housefull 4 ठरला पहिला ग्राहक
Housefull 4 (संग्रहित संपादित प्रतिमा)

अतिरक्त कमाई करण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) एक नामी युक्ती शोधून काढली आहे. महसुलात भर पडावी यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, रेल्वेने नवीन योजनेंतर्गत जाहिरातींच्या कामांसाठी ट्रेन बुक करण्याचे ठरविले आहे. रेल्वेने आपल्या या उपक्रमाला 'प्रमोशन ऑन व्हील्स' (Promotion On Wheels) असे नाव दिले आहे. रेल्वेने म्हटले आहे की, या उपक्रमांतर्गत कला, संस्कृती, चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम, क्रीडा इत्यादी गोष्टींचे जाहिरात कार्य आणि जाहिरात यासाठी खास गाड्या उपलब्ध असणार आहेत.

या उपक्रमाचा पहिला ग्राहक ठरला आहे अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 4' (Housefull 4) चित्रपट. 'हाऊसफुल 4' च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आधीच ट्रेन बुक केली आहे. आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेने चालविलेली ही पहिली विशेष 'प्रमोशन ऑन व्हील्स' ट्रेन असणार आहे. ही ट्रेन 'हाऊसफुल 4'च्या टीमच्या समन्वयाने बुधवारी मुंबई सेंट्रल येथून, सेलिब्रिटी आणि मीडिया कर्मचार्‍यांसमवेत सुटेल आणि गुरुवारी नवी दिल्ली येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये 8 डबे असणार आहेत. (हेही वाचा: जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर पहील्यांदाच सोबत करणार रुपेरी पडद्यावर काम; पाहा Housefull 4 मधली त्यांची पहिली झलक)

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांच्या म्हणण्यानुसार, ही गाडी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांमधून आणि महत्त्वपूर्ण जिल्ह्यातून जाईल. देशभरात चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी रेल्वेने या एफटीआर (पूर्ण दर दर) गाड्यांचा वापर करण्याची ऑफर दिली. या गाड्यांचे सर्व नियोजन आणि व्यवस्थापन आयआरसीटीसीकडे असणार आहे. येत असलेल्या नवीन चित्रपटांचे प्रमोशन रेल्वे मार्फत करण्यासाठी, रेल्वेने अनेक प्रॉडक्शन हाऊसला आधीच संपर्क साधला आहे.