बाहुबली चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबातीचे (Rana Daggubati) वडील सुरेश बाबू (Daggubati Suresh Babu) यांच्या घर आणि स्टुडिओसह अन्य ठिकाणांवर आयकर विभागाने (Income Tax Department) छापे मारले आहेत. बुधवारी सकाळी ही कारवाई सुरू करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. हैदराबादमध्ये सुरेश बाबू यांचा 'रामानायडू' नावाचा स्टुडिओ आहे. सुरेश बाबू हे टॉलिवूडचे निर्माते आहेत. बुधवारी रात्री आयकर विभागाने त्यांच्या हैदराबादमधील निवासस्थावरही छापा मारला. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरेश बाबू यांच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे. यातील काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. परंतु, अद्याप याबाबत दग्गुबाती सुरेश बाबू यांच्याकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. (हेही वाचा - Yash Raj Films वर तब्बल 100 कोटीचा फसवणुकीचा गुन्हा दाखल; कलाकारांची रॉयल्टी हडपण्याचा आरोप)
आयकर विभागाचा छापा पडला तेव्हा दग्गुबाती सुरेश बाबू भारतात नव्हते. सध्या आयकर विभागाच्या नजरेत इतर काही निर्मात्यांचे प्रॉडक्शन हाऊसही आहेत. यामध्ये नॅचरल स्टार नानी, हरिका हसाईन क्रिएशन्स, सितारा एंटरटेन्मेंट यांचा समावेश असल्याचे समजते.
दग्गुबाती सुरेश बाबू हे टॉलिवूडचे मोठे निर्माते म्हणून ओळखले जातात. सुरेश बाबू हे निर्माते दग्गुबाती रामानायडू यांचे पूत्र आहेत. त्यांनी सुरेश प्रॉडक्शनची सुरूवात केली होती. सुरेश बाबू यांनी आतापर्यंत 150 चित्रपटांची निर्मिती केली आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये 'रामानायडू' या प्रॉडक्शन हाऊसचे काही थिएटर्सही आहेत.