Hindi Movies Releases in 2020 (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराविरुद्ध भूमिका घ्यायची ठरवली. त्यासाठी ती स्वतः आंदोलकांना विद्यापीठात जाऊन भेट दिली होती. मात्र दीपिकाच्या या भेटीनंतर तिच्यावर जितका कौतुकाचा वर्षाव करण्यात आला तितकेच तिला टीकेलाही सामोरे जावे लागले. भाजप नेत्यांनी आणि समर्थकांनी तिला निशाणा करत तिच्यावर अनेक टीका केल्या. तसेच काहींनी तिचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘छपाक’ वर बहिष्कार टाकण्याचे देखील म्हटले आहे.

या शुक्रवारी दीपिकाचा ‘छपाक’ तर अजय देवगणचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी स्पर्धा करत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या दोन्ही सिनेमांना आपले समर्थन दर्शवले आहे.

त्यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे. आव्हाडांनी समर्थानच नव्हे तर दोन्ही चित्रपट करमुक्त करावेत अशी भूमिका घेतली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आव्हाड लिहितात, "'तान्हाजी' व 'छपाक' हे दोन्ही चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावेत अशी माझी सरकारमध्ये भूमिका आहे."

दीपिका त्या लोकांसोबत उभी आहे, जे लोक देशाचे तुकडे करु इच्छितात : स्मृती इराणी

तसेच ट्विट करताना आव्हाड लिहितात, "‘स्त्रियांचे शोषण आणि अत्याचार यामध्ये देशात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. छ्पाक चित्रपटामध्ये ॲसिड हल्ल्यामधून बचावलेली तरूणी आणि तीचा समाजाशी संघर्ष याचे कथानक करण्यात आले आहे. या चित्रपटाला करमुक्त (Tax Free) करावे अशी मी सरकारमध्ये भूमिका घेणार आहे."