Sushant Singh Rajput Death: केमिकल इंजिनिअरींग सोडली अन् अभिनय क्षेत्राकडे वळला; जाणून घ्या सुशांत सिंह राजपूत याचा जीवनप्रवास
Sushant Singh Rajput (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चे जीवन संपवले आहे. सुशांतने आज वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अवघ्या काहीत दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजरने आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त कळताच संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. सुशांतने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी केमिकल इंजिनिअरींग सोडून दिली होती. आज मोठ्या कलांकारांमध्ये त्याचे नाव जोडले जात आहे. तर, जाणून घेऊया सुशांतचा हेवा वाटणारा प्रवास.

सुशांत सिंह राजपूत याने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, एकेकाळी गाजलेल्या पवित्रा रिश्ता मालिकेतील मानव आणि महेंद्र सिंह धोनी याच्या जीवनावर अधारित चित्रपटाने त्याला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. परंतू, आज अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच त्याचे चाहते धास्तावून गेले आहेत. सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड कलाकार, राजकीय नेत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहली आहे. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Commit Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'ही' होती शेवटची पोस्ट

सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारचा आहे. मात्र, त्याचे संपूर्ण बालपण दिल्लीतच गेले. त्यानंतर सुशांत ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम देऊन त्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्याने केमिकल इंजिनिअरींगला प्रवेशही घेतला होता. मात्र, यामध्ये आपले मन रमत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने दुसऱ्या वर्षी हे शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे करियर असे त्याने ठरवले. सुशांतला 2006 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला ऐश्वर्या राय बच्चनसोबत नृत्य करण्याची संधी मिळाली होती.

मुंबईमध्ये नादिरा बब्बरसोबत अभिनयाच्या क्षेत्रात काम करुन एलन-अमीनकडून तो काही अॅक्शन शिकला होता. यावेळी एका नाटकाच्यावेळी मालिका आणि चित्रपट निर्माता एकता कपूर त्याठिकाणी उपस्थित होती. तिने त्याच्या टॅलेंटला हेरले. त्यानंतर त्याने ‘पवित्र रिश्ता’मधून त्याने आपल्या छोट्या पडद्यावरील अभिनयाला सुरुवात केली. त्यावेळी सुशांत सिंह राजपुत प्रत्येकाच्या घरोघरी पोहचला होता. सुशांतने ‘काई पो चे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवडूमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘शुद्ध देसी रोमान्स’या यशराज फिल्म्सच्या चित्रपटातही काम केले होते. डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी आणि एम.एस.धोनी या चित्रपटांनी त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली.