अखेर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांचा चित्रपट 'गुलाबो-सिताबो' (Gulabo Sitabo) Amazon Prime वर प्रदर्शित झाला आहे. बिग बी यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. विकी डोनर, पिकू, ऑक्टोबर अशा लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक शूजित सरकार (Shoojit Sircar) यांनी हा चित्रपट डायरेक्ट केला असून, जूही चतुर्वेदी यांनी या फिल्मची कथा लिहिली आहे. एक चित्रपट म्हणून याकडे पाहिल्यास नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन होते, मात्र आता काळासोबत प्रेक्षक सुजाण झाले आहेत. त्यांना पाहण्यासाठी अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे व यामुळेच चित्रपट आणि सिरीज यांच्या उत्तम कंटेंटबाबतची स्पर्धा आता वाढली आहे आणि इथेच गुलाबो सिताबो कमी पडतो. उत्तम अभिनय, उत्तम दिग्दर्शन, उत्तम सेट, उत्तम पटकथा मात्र कथेत अजिबात दम नसल्याने शेवटपर्यंत रुखरुख लागून राहते. याशिवाय संगीत आणि गाण्यांच्या बाबतीतही या चित्रपटाने घोर निराशा केली आहे.
जीव नसलेली कथा ताणून ताणून तुटायचे बाकी असताना फक्त बिग बी आणि आयुष्मान यांच्या अभिनयाने तिला तारले आहे. या चित्रपटाला लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असून, अनेकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. चित्रपटाची कथाच इतकी ठिसूळ असल्याने तुम्ही इतर कितीही ठिगळे जोडा, चित्रपट संपल्यावर समाधानाचा भाव काही चेहऱ्यावर उतरत नाही. त्यामुळे चित्रपटाची कथा कशी वाईट आहे हे सांगण्यापेक्षा, चित्रपटात अशा काही गोष्टी आहे ज्यामुळे एकदा तरी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता, ही कारणे आम्ही सांगत आहोत.
अमिताभ बच्चन व आयुष्मान खुराना अभिनय-
बिग बी आणि आयुष्मान या दोघांनीही चित्रपटात घरमालक व भाडेकरू अशा भूमिका साकारल्या आहेत. बांके (आयुष्मान) काही घर खाली खाली करायला तयार नाही, तर मिर्झा (अमिताभ बच्चन) त्याला घर सोडायला भाग पाडण्यास नवीन युक्त्या अवलंबायचे सोडत नाहीत. अशात या दोघांमधील केमिस्ट्रीचे समीकरण इतके चांगले जुळून आले आहे की, या जोडगळीने संपूर्ण चित्रपट खाऊन टाकला आहे. या दोघांचा अभिनय, हावभाव, संवादफेक इतके लाजबाव झाले आहे की यासाठी एकदा तरी हा चित्रपट पहाच. चित्रपटात दोघांच्या भूमिकेलाही एक खास स्टाईल आहे, ही स्टाईल संपूर्ण चित्रपटात तसूभरही कमी होताना दिसत नाही.
शुजीतचे दिग्दर्शन –
शुजीत सरकार हा एक सेन्सिटिव्ह दिग्दर्शक आहे. नात्यामधील हळुवारपणा अतिशय सटलरित्या उलगडून दाखवण्यात या दिग्दर्शकाचा हातखंड आहे. या चित्रपटातही ती कमाल दाखवली आहे. मिर्झा आणि बांके यांचे खट्टा-मिठा नात्यातील वळणे आणि शेवटी दोघांचेही एकाच डेस्टिनेशनला पोहोचणे हे इतके उत्तमरीत्या मांडले आहे की, शेवटी तुम्हाला या जोडगळीचा रागही येतो व त्यांची कीवही वाटते. चित्रपटामध्ये छायाचित्रणाला तसा काही वाव नसला तरी, आहे त्या सिन्समध्येही उत्तम सर्जनशीलता वापरून ते नव्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा पसारा तसा मोठा नाही मात्र जो काही 'रायता फैल गया है' तो वेळीच आवरल्याने चित्रपट जास्त बोअरिंग वाटत नाही. या ठिकाणी चित्रपटाची पटकथा कामी आली आहे. (हेही वाचा: Gulabo Sitabo: अमिताभ बच्चन यांनी दिले आयुष्मान खुराना, दीपिका पादुकोण, विराट कोहली अशा 7 सेलेब्जना खास चॅलेंज; जाणून घ्या कोणी केले पूर्ण)
सामाजिक संदेश –
घरमालक आणि भाडेकरून यांच्यामधील हवेलीसाठीचा संघर्ष या चित्रपटात आहे. मात्र यामध्ये विनोदी ढंगाने एक फार मोठा सामाजिक संदेशही दिला आहे. घरमालक आणि भाडेकरू या दोघांनाही आपल्या हक्काची, कायद्याची जाणीव असावी. तसेच आजच्या काळात शिक्षण कसे महत्वाचे आहे, आजूबाजूला चालू असलेल्या गोष्टींचे भान ठेवणे, आपल्याजवळ असलेल्या गोष्टीची योग्य किंमत राखणे, आपल्या घराबाबत जर काही समस्या उद्भवलीच तर त्या संदर्भातील सरकारी प्रक्रिया कशा चाललात या सर्वांची थोडीफार का होईना पण आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, नाहीतर आजच्या काळात कोणीही तुम्हाला उल्लू बनवून जाऊ शकते, हे या चित्रपटात दाखवले आहे.
लखनौची तहजीब आणि नवाबी शैली –
या संपूर्ण चित्रपटाची पार्श्वभूमीवर लखनऊची आहे. या चित्रपटात सुजित सरकारने नवाबी शहराची एक खास शैली दाखविली आहे. नवाबी हवेली, शहरातील रस्ते, गल्ल्या, लोकांची बोलण्याची पद्धत, त्यांचे राहणीमान अशा अनेक गोष्टींमुळे या चित्रपटाला मस्त फोडणी मिळाली आहे. चित्रपटातील पात्रांसोबत तुम्ही अशा गोष्टींमध्येही गुंतून जाता. कथेपेक्षा चित्रपटातील मिर्झाची लखनौची तहजीब, बेगमचा (मिर्झाची पत्नी) नवाबी करारीपणा आणि बांकेची एका ठराविक पद्धतीने बोलण्याची स्टाईल याच गोष्टी जास्त मनोरंजन करतील.
संवाद –
चित्रपटामधील संवादही जूही चतुर्वेदीचे आहेत. चित्रपट पाहिल्यावर ही गोष्ट प्रामुख्याने जाणवते की, या चित्रपटामधील संवाद हे नेहमीच्या विनोदी चित्रपटांमधील संवादापेक्षा फार वेगळे आहेत. यामध्ये विनोदी संवादाचा भरणा नसला तरी जे आहेत ते इतके युनिक आणि लखनवी टच वाले आहेत की, या संवादासाठी एकदा तरी हा चित्रपट जरूर पहावा. महत्वाचे म्हणजे यातील प्रत्येक व्यक्तीरेखेची एक विशिष्ठ स्टाईल आहे, पार्श्वभूमी आहे. त्यामुळे हे संवादही त्याच पठडीतले असणे व ते तसेच बोलणे गरजेचे आहे. या ठिकाणी चित्रपटामधील सर्वच कलाकारांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. अमिताभजी आणि आयुष्मानने तर आपल्या संवादफेकीने चित्रपटाला चार चांद लावले आहेत.
Last but ot the Least… बेगम! फारुख जफर यांनी या चित्रपटात अमिताभ यांच्या बेगमची भूमिका साकारली आहे. ही भूमिका अतिशय छोटी असली तरी अतिशय भाव खाऊन गेली आहे. शेवटी संपूर्ण चित्रपटाचा ट्रॅकच या बेगमच्या पात्राने बदलला आहे त्यामुळे ते पात्र चित्रपटात जरी जास्त काळ दिसत नसले, तरी ते महत्वाचे आहे हे प्रेक्षकांना जाणवत राहणे महत्वाचे होते. इथेच फारुख जफर यशस्वी झाल्या आहेत. अगदी मोजकेच संवाद आणि मोजकेच सिन्स असले तरी त्यांनी चित्रपटामध्ये आपली छाप उत्तमरीत्या सोडली आहे.
तर या काही चित्रपटाच्या जमेच्या बाजू होत्या मात्र तरी कथेमुळे चित्रपटाचा प्रयोग कुठेतरी फसल्यातच जमा आहे. रेटिंगच्या बाबत विचार करायचे झाले तर आम्ही या चित्रपटाला अडीच स्तर दिले असते.