Laxmmi Bomb, Sadak 2, Bhuj: The Pride of India Poster (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गामुळे देशव्यापी लॉकडाउन (Lockdown) ची घोषणा केली होती. जवळजवळ तीन महिने सर्व थिएटर बंद आहेत. देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत असताना, चित्रपटगृहे उघडण्यास अजूनही परवानगी नाही. अशात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा 'गुलाबो सिताबो' सिनेमा थिएटर ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. हे पाहता आता 7 मोठ्या चित्रपटांच्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अक्षय कुमारचा (Akshay Kuma) 'लक्ष्मी बॉम्ब' (Laxmmi Bomb) ते अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' (Bhuj: The Pride of India), आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'सडक 2’ (Sadak 2) आणि सुशांत सिंग राजपूतचा 'दिल बेचरा' यांचा समावेश आहे.

अक्षय कुमार, अजय देवगण, वरुण धवन, आलिया भट्ट आणि अभिषेक बच्चन हे कलाकार सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता ओटीटी प्लॅटफॉर्म, 'डिस्ने हॉटस्टार' (Disney + Hotstar) इंस्टाग्रामवर लाईव्ह आले होते. यावेळी या स्टार्सनी घोषणा केली की, त्यांचे चित्रपट थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातील. चला जाणून घेऊया, कोणते आहे हे 7 चित्रपट.

लक्ष्मी बॉम्ब -

या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यापासून अक्षय कुमारच्या या चित्रपटाची चर्चा आहे. या सिनेमात अक्षयसोबत कियारा अडवाणीही दिसणार आहे. हा चित्रपट एक विनोदी-भयपट आहे, ज्यामध्ये अक्षय एका महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे.

सडक 2 -

1991 साली महेश भट्टचा सुपरहिट चित्रपट ‘सडक' आला होता. आता 19 वर्षांनंतर महेश भट्ट या सिनेमाचा सिक्वल घेऊन येत आहे. 'सडक 2' मध्ये संजय दत्त, आलिया भट्ट, पूजा भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' -

'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' हा इतिहासातील खऱ्या घटनांवर आधारित एक युद्धपट आहे. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि सह-निर्माता अभिषेक दुधैया आहेत. चित्रपटाची कहाणी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. यात अजय देवगन भुज विमानतळ प्रभारी विजय कर्णिक अशा मुख्य भूमिकेत आहे.

'द बिग बुल' (The Big Bull) -

कुकी कोहली दिग्दर्शित 'द बिग बुल' ची निर्मिती अजय देवगन, आनंद पंडित यांनी केली आहे. चित्रपटाची कथा स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन हर्षद मेहताची भूमिका साकारत आहे.

'दिल बेचरा' (Dil Bechara) -

दिल बेचरा' हा सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट आहे. सुशांत आता आपल्यामध्ये नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केले आहे. मुकेश एक सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे, त्यांनीच सुशांतला त्याच्या पहिली फिल्म 'का पो चे' मध्ये कास्ट केले होते. 'दिल बेचार' हा 'द फॉल्ट इन अवर स्टार' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

'लूटकेस' (Lootcase) -

'लूटकेस' हा राजेश कृष्णन दिग्दर्शित विनोदी चित्रपट आहे. पैशाने भरलेली लाल सूटकेस या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे जी, नंदनला (कुणाल खेमू)ला मिळते. पोलिस, गुंड आणि नेते सर्वजण या सुटकेसच्या शोधात आहेत व त्यातून घडणारी कॉमेडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

'खुदा हाफिज' (Khuda Haafiz) -

'खुदा हाफिज' हादेखील सत्य घटनांनी प्रेरित चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन फारूक कबीर यांनी केले आहे. हा एक रोमँटिक-अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरची लोकप्रियता झाली कमी; सोशल मीडियावर 5 लाख युजर्संनी केलं अनफॉलो)

तर अशाप्रकारे पुढच्या काही आठवड्यांमध्ये हे सात चित्रपट 'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर प्रदर्शित होत आहेत. याशिवाय नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमवरही काही महत्वाचे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. मात्र दुर्दैवाने मराठी चित्रपटांना  ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.