Dream Girl Trailer: कधी रामायणातील सीता तर कधी कॉल सेंटरमधील पूजा बनून आयुष्मान खुराना करणार लोकांचे मनोरंजन (Video )
Dream Girl Trailer. (Photo Credits: YouTube/Screengrab/ Balaji Motion Pictures)

आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक तगडा अभिनेता. विकी डोनरपासून सुरु झालेल्या या प्रवासात आयुष्मानने अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. आता आयुष्मानचा नवीन चित्रपट ड्रीम गर्ल (Dream Girl) लवकरच प्रदर्शित होत आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर (Dream Girl Trailer) प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये आयुष्मान कधी रामायणातील सीता होताना दिसत आहे, तर कधी फोनवर लोकांशी पूजा या नावाने बोलून त्यांचे मनोरंजन करत आहे. बधाई हो नंतर पुन्हा एकदा एक निखळ मनोरंजनाचा खजाना घेऊन आयुष्मान येत आहे.

या चित्रपटात आयुष्मानला महिला मैत्री कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळते, ज्यामध्ये तो एकमेव पुरुष कर्मचारी आहे. इथे आयुष्मान 'पूजा' बनून एका स्त्रीच्या आवाजात लोकांशी बोलतो. हळू हळू लोकांना त्याचा आवाज आवडू लागतो. काही दिवसांतच तो या कॉल सेंटरचा सर्वात आवडता टेलिकॉलर बनतो. प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडतो, मात्र मूळ पुरुष असलेला कर्मचारी या खोट्या नाटकात कसा अडकत जातो आणि त्यानंतर काय गमती जमती घडतात त्याची कथा ड्रीम गर्लमध्ये दिसणार आहे.

विशेष म्हणजे स्वत: आयुष्मानने या चित्रपटासाठी आपले संवाद स्त्री आवाजात बोलले आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबत नुसरत भरूचा (Nushrat Bharucha) आणि अन्नू कपूर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन-लेखन राज शांडिल्या (Raaj Shandilya) यांनी केले असून, एकता कपूर व शोभा कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ड्रीम गर्ल हा चित्रपट 13 सप्टेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.