अ‍ॅसिड विकत घेण्यासाठी दीपिका पादुकोणने केले 'स्टिंग ऑपरेशन'; एका दिवसात 24 बाटल्यांची खरेदी (Video)
Deepika Padukone Look In Chhapaak Film (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ‘छपाक’ (Chhapaak) चित्रपट सध्या चर्चेत आहे. अ‍ॅसिड (Acid) हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी हिच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. दीपिका पादुकोणने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने भारतात अ‍ॅसिड विक्रीमुळे होणाऱ्या समस्यांविषयी सांगितले आहे. दीपिका पादुकोणने अलीकडेच तिच्या चित्रपटाच्या टीम 'छपाक' बरोबर एक 'सामाजिक प्रयोग' केला. यामध्ये त्यांनी काही दुकानदार कोणताही आयडी पुरावा न पाहता, किती सहजतेने अ‍ॅसिडची विक्री केली जाते हे दाखवून दिले आहे. थोडक्यात दीपिकाने एक स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) करून दारूण वास्तव आपल्यासमोर ठेवले आहे.

अ‍ॅसिड खरेदीसाठी दीपिकाने आपली टीम तयार केली आहे. यामध्ये हे लोक आपली खोटी ओळख सांगून दुकानातून अ‍ॅसिड खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. या सर्व गोष्टी दीपिका स्वतः दोन कॅमेरामॅनसह कारमध्ये बसून पाहत आहे. ग्राहक आणि दुकानदार यांमध्ये होणारे संभाषणही ती ऐकत आहे.

पहा व्हिडिओ -

ग्राहक त्वचेला इजा पोहचेल अशा कडक अ‍ॅसिडची मागणी करतो आणि दुकानदार चौकशी न करता ते देतोही. या व्हिडिओमध्ये एक दुकानदार सोडून इतर कोणत्याही अ‍ॅसिड विक्रेत्याने आयडी पुरावा मागितला नाही. व्हिडिओच्या शेवटी सुप्रीम कोर्टाच्या कडक आदेशांनंतरही, आपली टीम 24 बाटल्या खरेदी करण्यात यशस्वी झाल्याचे दीपिका पदुकोण सांगते. त्यानंतर अ‍ॅसिड हल्ल्यातील पिडीत अ‍ॅसिड खरेदी आणि विक्री करण्याचे नियम समजावून सांगतात.

अ‍ॅसिड खरेदी-विक्री करण्याचे नियम -

अ‍ॅसिड विकत घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. अ‍ॅसिड विकत घेताना आपला आयडी पुरावा, पत्ता देणे आवश्यक आहे. अ‍ॅसिड विकणार्‍या दुकानदाराकडे अ‍ॅसिड विक्रीचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच अ‍ॅसिड खरेदी विक्रीबद्दल दुकानदाराने पोलिसांना याची माहिती देणे गरजेचे आहे.