'या' तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन दीपिका पदुकोन व रणवीर सिंह साजरा करणार आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम
दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह (Photo Credit : Instagram)

2018 मध्ये बॉलिवूडच्या तीन प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सोनम कपूर आणि प्रियांका चोप्राने लग्न केले. दीपिका पादुकोणचे अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सोबत 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्न झाले होते. आता या सुंदर जोडप्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसासारख्या या खास प्रसंगी कोणत्या प्रकारचे सेलिब्रेशन पार पडणार आहे, याची माहिती समोर आली आहे. दीपवीर आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस पूजा अर्चना करत साजरा करणार आहेत. तिरुपती आणि अमृतसर अशा तीर्थक्षेत्री दीपिका व रणवीर आपल्या कुटुंबासमवेत लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत.

असा असेल संपूर्ण कार्यक्रम - 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीर उद्या तिरुपतीच्या दर्शनासाठी रवाना होतील. यानंतर ते अमृतसरलाही जातील. दोघेही आपल्या कुटुंबासमवेत दोन दिवस व्यतीत करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबरला हे दोघे तिरुपती बालाजीला भेट देतील. यासह ते पद्मावती मंदिरातही जातील. यानंतर, 15 नोव्हेंबरला ते अमृतसरसाठी रवाना होतील. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट देण्याची या दोघांची योजना आहे. त्यानंतर त्याच दिवशी, म्हणजे 15 नोव्हेंबरला ते आपल्या कुटूंबासह मुंबईला येण्यासाठी रवाना होतील. (हेही वाचा: दीपिका पादुकोण चा लाल रंगाच्या ड्रेस मधील 'Red Hot' फोटो पाहून पती रणवीर सिंह दिली अशी रोमँटिक कमेंट)

दरम्यान, लग्नाच्या  6 वर्षे आधीपासून दीपिका व रणवीर रिलेशनशिपमध्ये होते. गलियों की रासलीला: रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि फाइंडिंग फेनी या चित्रपटांमध्ये या जोडप्याने एकत्र भूमिका साकारल्या आहेत. आगामी चित्रपटाविषयी बोलायचे तर, ही जोडी पुन्हा एकदा 83 चित्रपटात दिसणार आहे, हा 1983 साली भारताने जिंकलेल्या विश्वचषक कथेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देव आणि दीपिका पादुकोण कपिलच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता उद्याच्या खास दिवसाबद्दल दोघेही फार उत्साहित आहेत, मात्र चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती त्यांच्या फोटोंची.