Bollywood Wives: दिग्दर्शक मधुर भांडारकरचा करण जोहरवर शीर्षक चोरीचा आरोप; 5 वेळा नोटीस पाठवूनही Dharma Productions कडून उत्तर नाही
Madhur Bhandarkar, Karan Johar (Photo Credits: Facebook, Instagram)

करण जोहर (Karan Johar) आणि वाद यांचे नाते फार जुने आहे. याआधी कंगना रनौतमुळे करण वादाच्या भोवऱ्यात सापडला होता आता दिग्दर्शक मधुर भांडारकरसोबत (Madhur Bhandarkar) एका नव्या वादाला ठिणगी मिळाली आहे. मधुर भांडारकरने आरोप केला आहे की, धर्मा प्रोडक्शन (Dharma Productions) आणि करण जोहर यांनी आपले Bollywood Wives टायटल चारले आहे. या प्रकरणाबाबत तब्बल 5 वेळा नोटीस पाठवली गेली आहे मात्र अजूनही करण जोहरने उत्तर दिले नसल्याचे भांडारकर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

याबाबत 20 नोव्हेंबर रोजी माहिती दिताना मधुर भांडारकर यांनी ट्वीट केले होते की, ‘करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी माझ्याकडे माझ्या Bollywood Wives या टायटलची मागणी केली होती. मात्र याच नावाचा माझा एक प्रकल्प चालू असल्याने मी त्यांना हे टायटल देण्यासाठी नकार दिला. त्यानंतर त्यांनी माझ्या टायटलमध्ये थोडाफार बदल करत 'The Fabulous Lives of Bollywood Wives' या नावाने त्यांची वेबसिरीज बनवली. ही गोष्ट नैतिकदृष्ट्या चुकीची आहे. यामुळे माझ्या प्रकल्पावर परिणाम होईल म्हणूनच मी विनंती करतो की कृपया तुमचे टायटल बदला.’

मधुर भांडारकरच्या या ट्वीटनंतर करण जोहर किंवा धर्मा प्रोडक्शनकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यानंतर मधुर भांडारकर यांनी वेळोवेळी तब्बल 5 नोटीसा करण जोहरला पाठवल्या आहेत, या नोटीसांनाही कोणतेही उत्तर मिळाले नाही.

याबाबत भांडारकर म्हणतात. ‘माझ्या चित्रपटाचे शीर्षक Bollywood Wives चा गैरवापर करून त्यामध्ये थोडा बदल करून स्वतःचे शीर्षक बनवल्याप्रकरणी, 19 नोव्हेंबर पासून धर्मा प्रोडक्शनला 5 नोटीसा पाठवल्या आहेत. यामध्ये IMPPA कडून 2, IFTDA कडून 1 व FWICE कडून 2 नोटीसा पाठवल्या गेल्या आहेत. या सर्व चित्रपट उद्योगातील अधिकृत संस्था आहेत. धर्माकडून वरील कोणत्याही संघटनांना अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.’

दरम्यान, करणचा शो 'The Fabulous Lives of Bollywood Wives' 27 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा शो बॉलीवूड अभिनेत्री सीमा खान, माहीप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी सोनी या पत्नींच्या जीवनात आधारित आहे. गेल्या शुक्रवारी या सिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून यात शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान, भावनाची मुलगी अनन्या पांडे, संजय आणि समीर पाहुण्यांच्या भूमिकेत आहेत.