गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देतील बॉलिवूडचे हे '5' सिनेमे !
मसान-डिअर जिंदगी सिनेमातील दृश्य (Photo Credits : Youtube)

आयुष्य हे चढ-उतारांनी बनलेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे चढ-उतार, अडीअडचणी अनेक येतात. अनेकदा तर खूप दुबळे, तुटल्यासारखे वाटते. काहीजण तर स्वतःवरचा विश्वास गमावून बसतात. पण या परिस्थितीतून देखील आपण बाहेर पडू शकतो. त्यासाठी बॉलिवूडचे काही सिनेमे नक्कीच प्रेरणादायी ठरतील.

बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे येत असतात. काही हसवतात, काही डोळ्यात पाणी आणतात तर काही प्रेरणा देतात. बॉलिवूडचे असेच काही सिनेमे जे तुम्हाला तुमचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देतील....

सिक्रेट सुपरस्टार

आपल्या स्वप्नपूर्तीच्या उद्देशाने झपाटलेल्या एका शालेय मुलीची ही गोष्ट आहे. वडीलांचा विरोध आणि इतर सर्व कठीण परिस्थितीचा सामना करत ती आपले ध्येय कसे गाठते, यावर या सिनेमाचा प्रवास आहे. सिक्रेट सुपरस्टार या सिनेमात आमिर खान आणि जायरा वसीम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सूरमा

हॉकी प्लेअर संदीप सिंगच्या जीवनावर आधारित हा सिनेमा तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. या सिनेमात संदीप सिंगच्या आयुष्यातील कठीण प्रसंग दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक अडचणींचा सामना करत त्यांनी यश मिळले आहे. या सिनेमात दिलजीत दोसांझने प्रमुख भूमिका साकारली आहे. दिलजीतशिवाय सूरमा मध्ये तापसी पन्नू आणि अंगद बेदी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मसान

आयुष्य काय आहे? या प्रत्येकाला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या सिनेमातून मिळेल. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात त्यात आपण पूर्णपणे तुटून जातो. पण आयुष्याची गती संथ झाली याचा अर्थ आयुष्य थांबले असा नाही, हा खास संदेश या सिनेमातून मिळतो. आयुष्यातील दुःख मागे सारत पुढे जाण्यातच खरे आयुष्य असते. मसान सिनेमात विक्की कौशल आणि ऋचा चड्ढा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

इकबाल

प्रत्येकाला आपण काहीतरी करुन दाखवावे, अशी इच्छा असते. पण कष्टाने स्वप्नांचा पाठपुरावा केल्यास ध्येय गाठता येते. हाच संदेश हा सिनेमा देतो. या सिनेमात नसीरुद्दीन शाह आणि श्रेयस तळपदे प्रमुख भूमिकेत आहेत.

डिअर जिंदगी

आलिया भट्ट आणि शाहरुख खानचा हा सिनेमा आजकालच्या सिनेमांपेक्षा काहीसा निराळा आहे. आजकालची युवा पीढी आपल्या रिलेशनशीपमधील प्रॉब्लेम्समुळे आपला आत्मविश्वास गमावून बसतात. याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो. हा सिनेमा तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवेल.