बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक महेश आनंद यांचे निधन; दोन दिवसांनंतर घरात आढळला मृतदेह
Bollywood Actor Mahesh Anand (Photo Credit: Instagram)

बॉलिवूडचा खलनायक (Bollywood Villain) महेश आनंद (Mahesh Anand) यांचे निधन झाले आहे. शनिवारी (9/2/1019) मुंबईतील यारी रोड (Yari Road) येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वीच महेश आनंद यांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोस्टमार्टमसाठी महेश यांचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये (Cooper Hospital) नेण्यात आला आहे. महेश आनंद 57 वर्षांचे असून मुंबईतील घरात ते एकटेच राहत असल्याची माहिती समोर येत आहे.

महेश आनंद यांनी अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या अनेक सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. गोविंदाचा अलिकडेच प्रदर्शित झालेला सिनेमा रंगीला राजा मध्येही त्याने काम केले होते. या सिनेमात त्यांनी तब्बल 18 वर्षांनंतर कॅमबॅक केले होते. तसंच महेश आनंद हे आर्थिक विवंचनेतूनही जात होते.एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, 18 वर्षात कोणीच मला सिनेमात काम दिले नाही. 18 वर्ष मी एकटाच होतो. माझ्याकडे कामही नव्हते आणि पैसाही.

महेश आनंद यांनी 'शहंशाह,' 'मजबूर,' 'स्वर्ग,' 'थानेदार,' 'विश्वात्मा,' 'गुमराह,' 'खुद्दार,' 'बेताज बादशाह,' 'विजेता' आणि 'कुरुक्षेत्र' अशा अनेक सिनेमात दमदार अभिनय केला होता. (लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री Naga Jhansi ची आत्महत्या; बॉयफ्रेंडशी भांडण झाल्याने उचलले टोकाचे पाऊल)

महेश आनंद यांनी चार वेळा केले होते लग्न

महेश यांनी चार विवाह केले होते. सर्वप्रथम त्यांनी बरखा रॉयशी लग्न केले. बरखा रॉय या अभिनेत्री रीना रॉय यांची बहिण होती. त्यानंतर त्यांनी 1987 मध्ये तत्कालीन मिस इंडिया एरिका मारिया डिसूजा यांच्याशी लग्न केले. यांना एक त्रिशुल नावाचा मुलगाही आहे. त्यानंतर त्यांनी 1992 मध्ये अभिनेत्री मधु मल्होत्रा यांच्याशी लग्न केले. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी रशियन लेडी लानासोबत विवाहगाठ बांधली.