बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केली हॉरर थ्रिलर 'दुर्गावती' चित्रपटाची घोषणा
Bhagmati Movie (PC- Twitter)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) प्रेझेंटर म्हणून 'दुर्गावती' (Durgavati Movie) या चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षयने आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत घोषणा केली आहे. 'दुर्गावती' या चित्रपटात भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) मुख्य भूमिका साकारणार आहे. अक्षयने आपल्या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला आहे. यात चित्रपटाशी निगडीत 5 भूमिका दिसत आहेत. यात प्रत्येकाने आपल्या हातात एक पाटी धरलेली आहे.

या चित्रपटाचे प्रेझेंटर टी-सीरीजचे मालक भूषण कुमार हे आहेत. तसेच विक्रम मल्होत्रा या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 'दुर्गावती' हा चित्रपट तेलगुचा हॉरर थ्रिलर चित्रपट 'भागमती' चा (Bhagmati Movie) हिंदी रिमेक आहे. 'भागमती' चित्रपटात अनुष्का शेट्टी, उन्नी मुकुंदन, जयराम, ऊषा सरत आणि विद्युलेखा रमन यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट 26 जानेवारी 2018 ला रिलीज झाला होता. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनचे पार्टीवेअर कपडे 2 डिसेंबरला विक्रीसाठी होणार उपलब्ध)

दरम्यान, भूमीनेदेखील आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत घोषणा केली आहे. भूमीने या चित्रपटासाठी उत्साही असल्याचं म्हटलं आहे. भूमीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात 'हिरो' ची पाटी आहे. म्हणजेच या चित्रपटात दुर्गावतीची भूमिका भूमी साकारणार आहे, हे स्पष्ट होत आहे. प्रेक्षकांची चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. यात अक्षयच्या हातात 'प्रेझेंटर' अशी पाटी आहे. त्यामुळे या चित्रपटात अक्षय कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.