Irrfan Khan जगाचा निरोप घ्यायच्या आधी कोरोना रुग्णांसाठी 'अशी' केली होती मदत, मात्र जगापासून लपवायची होती ही गोष्ट
Irrfan Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याची एक्झिट सर्व चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी होती. आपल्या जबरदस्त अभियनाच्या जोरावर त्याने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत मजल मारली. त्याच्या निधनानंतर त्याच्या बद्दल अनेक भावूक गोष्टी त्याचा मुलगा बाबिल सोशल मिडियाद्वारे लोकांना सांगत राहिला. दरम्यान इरफान खानबद्दल आणखी एक गोष्ट समोर आली आहे. त्याने मरणापूर्वी कोविड रुग्णांसाठी मोठी मदत केली आहे. त्याच्या जवळच्या मित्राने याबाबत खुलासा केला आहे. त्याच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, इरफानला ही गोष्ट जगासमोर आणायची नव्हती.

कोरोनाने मागील वर्षी वर्षाच्या सुरुवातीला भारतात शिरकाव केला होता. त्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत गेली. त्या दरम्यान इरफानने कोरोना रुग्णांसाठी पैशांची मोठी मदत केली होती. या बातमीची कुठेही वाच्यता होऊ नये असे इरफानने सांगितले होते.हेदेखील वाचा- दिवंगत अभिनेता इरफान खान याचा मुलगा बाबिल ने वडिलांच्या आठवणीत शेअर केला त्याचा पानीपुरी खातानाचा व्हिडिओ

या गोष्टीचा खुलासा इरफानचा मित्र जियाउल्लाह याने केला होता. त्यांनी सांगितले की, इरफानने त्याच्यासमोर अशी अट घातली होती की, या गोष्टीची खबर कोणालाच लागता कामा नये. इरफान म्हणायचा "जेव्हा उजव्या हाताने काम करतो तेव्हा डाव्या हाताला खबर लागता कामा नये." जियाउल्लाह म्हणाले एवढे मोठे स्टार असूनही इरफान खानमध्ये किंचितसुद्धा अहंकार नव्हता. तो एक सर्वसामान्य माणसासारखाच वावरायचा.

आज इरफान खानची पहिली पुण्यतिथी आहे. त्याचा मुलगा बाबिलने सोशल मिडियावर इरफान आजपर्यंत न पाहिलेले फोटोज शेअर केले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑस्कर 2021 पुरस्कार सोहळ्यात दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खान ज्याने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या छाप सोडली त्याच्यासह सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूर, भानू अथिया आणि अनेक दिवंगत स्टार्संना श्रद्धांजली वाहिली.