आशा भोसले यांनी 86 व्या वर्षी लॉन्च केले युट्युब चॅनल; 'या' गाण्याच्या व्हिडिओसह केला चॅनलचा शुभारंभ
Asha Bhosle (Photo Credits: Facebook)

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी स्वतःचे युट्युब चॅनल (YouTube Channel) सुरु केले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी डिजिटल विश्वातील त्यांचे पर्दापण नक्कीच कौतुकास्पद आहे. चॅनल लॉन्च संदर्भात बोलताना आशा भोसले म्हणाल्या की, "सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकजण घरात कैद आहे. त्यामुळे घरात खूप काळ नातवंडांना इंटरनेट विश्वात मुक्त संचार करताना पाहून मलाही एका नव्या विश्वाचा प्रत्यय आला. बुधवारी रात्री आशा भोसले यांनी युट्युब चॅनल लॉन्च केले. यासाठी त्यांना त्यांच्या नातीने प्रोत्साहित केल्याचे त्यांनी सांगितले."

"अनेक वर्षांपासून मी माझे विचार, अनुभव आणि भावना व्यक्त कराव्यात यासाठी मागणी होत होती. मात्र या सगळ्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. आता घरी असल्यामुळे 86 वर्षांचे अनुभव सर्वांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे लोकांचे मनोरंजनही होईल. त्यांचा काही वेळ आनंदात जाईल. काही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल." असेही त्या म्हणाल्या. परंतु, युट्युब चॅनल लॉन्च करण्याचे श्रेय आशाताई संपूर्णपणे आपल्या नातीला देतात. (Aaichi Aarti From Hirkani: आशा भोसले यांच्या आवाजातील 'आईची आरती';'हिरकणी' चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित)

युट्युब चॅनलची माहिती आशा भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसाचे 'मैं हूं' गाणे' गाऊन त्यांनी चॅनलचा शुभांरभ केला.

आशा भोसले पोस्ट:

आशा भोसले पुढे म्हणाल्या की, "माझी नात जनाईचा मला खूप लळा आहे. कारण तिच्यात एक कलात्मक पैलू आहे. ती एक गीतकार, गायिका, संगीतकार आणि कथ्थक नृत्यांगणा आहे. तिच्यात मला माझी छबी दिसते. त्यामुळे मला तिची अधिक ओढ आहे. लहान असून देखील ती मला खूप चांगल्या गोष्टी सांगते त्यामुळे माझ्या ज्ञानात नक्कीच भर पडते. माझा उत्साह पाहून माझ्या आयुष्यातील काही अनुभव रेकॉर्ड करण्यासाठी युट्युब चॅनल आधार घेण्याचीही कल्पना आणि प्रोत्साहन तिचेच होते."