Amitabh-Bachchan (Photo Credits: Facebook)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज त्यांचा 79  वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे सांगितले आहे की, ते पान मसाला (Paan Masala) कंपनी 'कमला पसंद' शी आपला करार मोडत आहेत. अलीकडेच या पान मसाला जाहिरातीमुळे अमिताभ बच्चन यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. आता बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये यासंदर्भात आपले निवेदन शेअर केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या ऑफिसकडून सांगण्यात आले आहे की, अमिताभ बच्चन यांना माहित नव्हते की ही जाहिरात ‘सरोगेट जाहिरात’ प्रकारात मोडते.

गेल्या आठवड्यात अमिताब बच्चन यांना याबद्दल माहिती मिळाली व त्यानंतर त्यांनी आपला करार संपुष्टात आणला. या जाहिरातीतून मिळालेले शुल्कही कंपनीला परत करण्यात आले आहे. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन अनेक जाहिराती करतात. त्याचे चाहतेही त्यांच्या नवनवीन जाहिरातींमुळे खूप प्रभावित झाले आहेत. अलीकडेच बिग बींनी ही पान मसालाची जाहिरात केली होती, त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

काही काळापूर्वी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष शेखर साळकर यांनी एक पत्र लिहिले होते, ज्यात असे म्हटले होते की पान मसाला लोकांच्या आरोग्यावर परिणाम करतो. तसेच बिग बी पल्स पोलिओ मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, त्यामुळे त्यांनी ही पान मसालाची जाहिरात त्वरित सोडली पाहिजे.

दरम्यान, गेल्या महिन्यात एका चाहत्याने अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर विचारले की त्यांनी अशा पान मसाल्याच्या ब्रँडला मान्यता देण्याचे का निवडले? त्याला उत्तर देताना ते म्हणाले होते – ‘प्रथम मी माफी मागतो. जर कोणी कोणत्याही व्यवसायात चांगले करत असेल, तर आपण त्याच्याशी का जोडले गेलो आहोत याचा विचार करू नये. अशा व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या व्यवसायाचाही विचार करावा लागतो. हे करून मला पैसे मिळतात.’ (हेही वाचा: अमिताभ बच्चन यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी जलसाच्या बाहेर केक कापत दिल्या शुभेच्छा)

मात्र आता आपल्या वाढदिवसादिवशी अमिताब बच्चन यांनी आपण ही जाहिरात व तो ब्रँड सोडला असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मिडियावर अमिताब बच्चन यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.