Allu Arjun | Facebook

'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनला समन्स बजावले आहे. ही घटना 4 डिसेंबर रोजी शहरातील प्रसिद्ध संध्या थिएटरमध्ये घडली, जिथे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिसांनी या प्रकरणी अल्लू अर्जुनला नोटीस बजावली असून त्याला मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. (हेही वाचा -Pushpa2 Box Office Collection: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ने तिसऱ्या वीकेंडला 50 कोटींचा टप्पा केला पार, एकूण कलेक्शन 692.50 कोटी रुपये)

या घटनेनंतर अभिनेता, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

त्या दिवशी काय झाले?

4 डिसेंबर रोजी प्रीमियरच्या दिवशी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी हजारो चाहते थिएटरबाहेर जमले होते. जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेसाठी पोलिसांनी थिएटर व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या अभावाला जबाबदार धरले आहे.

अल्लू अर्जुनने आरोप फेटाळून लावले

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी आरोप केला आहे की अल्लू अर्जुन पोलिसांच्या परवानगीशिवाय थिएटरमध्ये गेला, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. मात्र, अभिनेत्याने हे आरोप साफ फेटाळून लावले. अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर, त्याने त्याच्या चाहत्यांना संयम बाळगण्याचे आणि कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा किंवा हिंसक वर्तन टाळण्याचे आवाहन केले आहे.