सलमान-शाहरुख-बिग बी यांना मागे टाकून अक्षय कुमारने ‘या’ यादीत पटकावले पहिले स्थान

अक्षय कुमारने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला, कमर्शिअल चित्रपटांसोबतच आशयघन चित्रपटही  करत असल्याने अक्षय कुमारचे नेहमीच कौतुक होत असते. भारतातील सर्वात जास्त कमाई करण्याऱ्या अभिनेत्यांपैकी देखील तो एक आहे. नुकताच अक्षय कुमारच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला. स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्टनुसार, न्यूज़प्रिंटमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि लोकप्रिय असलेला सेलिब्रिटी खिलाडी कुमार ठरला आहे.

आपल्या ‘गोल्ड’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अक्षय कुमार १४ भारतीय भाषांमधल्या मुख्य १२५ वर्तमानपत्रांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला होता. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली आहे.

गोल्डच्या प्रदर्शनानंतरही अक्षय विविध कारणांनी चर्चेत राहिला. त्याच्या सामाजिक कार्यांमधील सहभागामुळे प्रेक्षक आणि मिडिया अशा दोहोंच्या चर्चेत अक्षय कुमारचे नाव होते. या यादीविषयी ‘स्कोर ट्रेंड्स’चे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणाले, “वर्तमानपत्रात त्याच्या फॅमिली हॉलिडेपासून ते सिनेमांचे प्रदर्शन तसेच फिटनेस आणि विविध कार्यक्रमांमधील त्याचा वावर बद्दल जे काही लिहून आले त्यामुळे तो सर्वाधिक चर्चिला गेलेला बॉलीवूड स्टार ठरला आहे.”

अश्वनी कौल पूढे म्हणतात, "१४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार अक्षय ८७ गुणांसह न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तर बिग बी अमिताभ बच्चन ८२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आणि अभिनेता सलमान खान ७१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यामागोमाग ऋषी कपूर आणि वरुण धवन यांच्या नावांचाही या यादीमध्ये समावेश होतो.