'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपट मराठीतही होणार प्रदर्शित; 10 डिसेंबरला होणार मराठी ट्रेलर लाँच
Ajay Devgn and Kajol (PC - Twitter)

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याची प्रमुख भूमिका असलेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) हा चित्रपट आता मराठीतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शूर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. आता मराठी प्रेक्षकांना आपल्या मायबोली भाषेत या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. येत्या 10 डिसेंबरला या चित्रपटाचा पहिला मराठी ट्रेलर लाँच होणार आहे.

या चित्रपटात अजय देवगण तान्हाजीची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका काजोल साकारणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काजोल आणि अजय देवगण यांना एकत्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना अजय देवगण म्हणाला की, एका शूर मराठा योद्ध्याची कथा हिंदी भाषेत तसेच त्याच्या मातृभाषेत प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. या चित्रपटात मला शूर योद्ध्याची भूमिका साकारायला मिळाली, हे माझ भाग्य आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशासमोर इतिहासाची पाने उलगडणार आहेत. या चित्रपटातून तान्हाजी मालुसरे यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास समस्त महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशाला पाहता येणार आहे, असंही अजयने सांगितलं. (हेही वाचा - Shankara Song in Tanhaji: तान्हाजी चित्रपटातील पहिले गाणे 'शंकरा रे शंकरा गाणे प्रदर्शित', अजय देवगण धरला नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यच्या तालावर ठेका, Watch Video)

या चित्रपटात काजोल सावित्रीबांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यासंबंधी प्रतिक्रिया देताना काजोलने सांगितले की, 'मला ही महाराष्ट्रीय व्यक्तिरेखा निभावणे प्रचंड आवडलं. 'सावित्री'ची भूमिका ही कणखर आणि अफलातून आहे. मी सावित्रीबाईच्या कार्याने भारावून गेले असून त्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडले आहे,' असं मत काजोलने व्यक्त केलं आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. तर अजय देवगणसह काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.