Payal Rohatgi (Photo Credits: Instagram)

भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगीला ( Payal Rohatgi) राजस्थान पोलिसांनी अहमदाबाद येथून रविवार अटक केली होती. आज पायलची 25 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयाने पायलला 24 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

एडीजे कोर्टाने आज पायलला जामिन मंजूर केला. पायलला बूंदी जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या जेलमध्ये खून, दरोडे आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिला आरोपींचा समावेश होता. पायल बूंदी तुरुंगात कैदी नंबर 2616 म्हणून कैद होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये पायलला जामीन मंजूर करण्यात आला. (हेही वाचा - अभिनेत्री पायल रोहतगी ,राजस्थान पोलिसांच्या ताब्यात; मोतीलाल नेहरू यांच्याविरुद्ध केलेलं विधान भोवलं)

पायल रोहतगीने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांविरोधात म्हणजेच मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. पायलने व्हिडिओ शेअर करताना केलेल्या दाव्यानुसार, मोतीलाल नेहरू यांच्या पाच पत्नी होत्या. म्हणून काँग्रेस सरकार तिहेरी तलाकच्या विरोधात होते. यासोबतच मोतीलाल नेहरू हे जवाहरलाल नेहरू यांचे सावत्र वडील होते, असा उल्लेख केला होता. पायलने आपल्या या दाव्यात एलिना रामाकृष्णाने लिहिलेल्या आत्मचरित्राचा उल्लेख केला होता. दरम्यान, अटकेची माहिती पायलने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली होती.