अभिनेते व माजी खासदार परेश रावल यांचे भाऊ हिमांशू रावल व कीर्ती रावल यांना जुगाराच्या अड्ड्यावरून अटक; साडेसहा लाखाचा ऐवज जप्त
Representational Imgae | Texas Hold'em Poker | (Photo Credits: Unsplash.com)

प्रख्यात चित्रपट अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल (Paresh Rawal) यांचा भाऊ हिमांशू रावल (Himanshu Rawal) याला गुजरात पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावरून पकडले आहे. गुजरात पोलिसांनी हिमांशु रावल यांच्यासह 20 जणांना विसनगरमधील जुगाराच्या अड्ड्यावरून (Gambling) अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मेहसाना (Mehsana) येथील कृष्णा सिनेमाजवळील मथुरादास क्लबवर छापा टाकला आणि हिमांशु रावल, कीर्ती रावल यांच्यासह 20 जणांना पकडले. या सर्वांकडून जवळजवळ दोन लाख रोख रक्कम, 16 मोबाईल, 3 वाहने इत्यादी वस्तू जप्त केल्या आहेत.

उत्तर गुजरातच्या मेहसानाच्या विसनगरमधील गौरव पथ येथील कृष्णा सिनेमाजवळ मथुरादास नावाचा एक क्लब परेश रावल यांचा चुलत भाऊ कीर्ती रावल चालवितो. कीर्ती रावल यांना या क्लबचे विश्वस्त म्हणूनही ओळखले जाते. परेश रावल यांचा भाऊ हिमांशू रावल लॉकडाऊन दरम्यान मुंबईहून विसनगरला आला होता. क्लबमध्ये, अहमदाबाद, गांधीनगर, मेहसाना आणि आसपासच्या इतर जिल्ह्यांतील जुगारी येथे येथून जुगार खेळतात. सोमवारी रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी येथून हिमांशु रावल, कीर्ती रावल यांच्यासह 20 जुगारांना अटक केली.

तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एसबी झाला यांनी सांगितले की, आरोपी हिमांशू रावल अहमदाबादचे माजी खासदार परेश रावल यांचे भाऊ आहेत आणि  त्यांचे आणखी एक चुलत भाऊ म्हणजे कीर्ती रावल. हे लोक गेल्या अनेक दिवसांपासून येथे जुगार खेळत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. हिमांशू रावल यांचे मुंबईमध्ये वास्तव्य असते. या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती, त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी या लोकांना ताब्यात घेतले. (हेही वाचा: अभिनेता Vidyut Jammwal चे मोठे यश; रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्यासोबत 'या' यादीमध्ये झळकले नाव, ठरला पहिला भारतीय)

पोलिस निरीक्षक भावेश राठोड यांनी सांगितले की, सर्व 20 आरोपींना जामिनावर सोडण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून अटक केलेले सर्व लोक अहमदाबाद आणि गांधीनगर येथील होते.