Actor Siddharth Receives Death Threats: अभिनेता सिद्धार्थला बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्यांचे कॉल; BJP IT Cell ने फोन नंबर लीक केल्याचा आरोप
Siddharth (Photo Credits: Instagram)

रंग दे बसंती’ सारख्या हिट चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण करणारा अभिनेता सिद्धार्थने (Siddharth), नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. या अभिनेत्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याला धमक्या मिळत असल्याची माहिती दिली आहे. सिद्धार्थने ट्वीट करून तमिळनाडूच्या भाजपा सेलवर (BJP TN ITcell) आपला फोन नंबर लीक केल्याचा आरोप केला आहे. लोक त्याला फोन करून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत ​​आहेत. आतापर्यंत जवळजवळ 500 कॉल आले असल्याचे त्याने सांगितले आहे. सिद्धार्थने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टॅग केले आहे.

सिद्धार्थ हे हिंदी आणि तमिळ चित्रपट इंडस्ट्रीमधील एक नावाजलेले नाव आहे. आता त्याने ट्वीट केले आहे की, ‘माझा फोन नंबर तमिळनाडू भाजपा आणि भाजपा तामिळनाडू आयटी सेलच्या काही सदस्यांनी लीक केला आहे. आतापर्यंत गेल्या 24 तासांमध्ये मला 500 हून अधिक कॉल आले आहेत, ज्यामध्ये अपमानजनक भाषा वापरण्यात आली आहे, मला व माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची तसेच बलात्काराची धमकी दिली गेली आहे. सर्व क्रमांक रेकॉर्ड (ज्यामध्ये भाजप आणि डीपीची लिंक सामील आहे) केले आहेत आणि पोलिसांना दिले आहेत. मी गप्प बसणार नाही, प्रयत्न करत रहा.’

सिद्धार्थच्या म्हणण्याप्रमाणे, कोविड-10 साथीच्या विषयावर आपली मते मांडल्यामुळे त्याला अशी धमकी मिळत आहे. सिद्धार्थने या साथीच्या आजाराशी लढण्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले होते. इतकेच नाही तर, फोनव्यतिरिक्त सोशल मीडियावरही सिद्धार्थला धमकावले जात आहे. सिद्धार्थने एका मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विट केला आहे. यामध्ये सिद्धार्थ म्हणतो की, 'सोशल मीडियावरील धमकीच्या बर्‍याच पोस्टपैकी ही एक पोस्ट आहे, ज्यात भाजप तामिळनाडूचे सदस्य माझा फोन नंबर लीक करीत आहेत आणि लोकांना माझ्यावर हल्ला करुन मला त्रास देण्यास सांगत आहेत.’ (हेही वाचा: अभिनेता जिमी शेरगिलविरुद्ध गुन्हा दाखल; कोरोना विषाणू नियमांचे केले उल्लंघन)

दुसरीकडे सिद्धार्थच्या ट्वीटला उत्तर देताना पक्षाच्या आयटी शाखेचे प्रदेशाध्यक्ष सी टी आर निर्मल कुमार यांनी टीओआयला सांगितले की, 'अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्यांमध्ये पक्षाच्या सदस्यांचा सहभाग नाही. कोणत्याही व्यक्तीच्या ट्वीट व मतांवर प्रतिक्रिया व्यक्त करू नका, अशी स्पष्ट सूचना पक्षाने केडरला केली होती. अशा प्रकारच्या कृतीमागे आमच्या सदस्यांचा हात आहेत हे आमच्या लक्षात आणून दिल्यास आम्ही त्याचा निषेध करू आणि त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करू.'