आमिर खान च्या कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाची लागण; परिवारासह त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह, आईची टेस्ट आज होणार
आमिर खान, किरण राव (Photo Credits: Youtube)

मुंबईमध्ये कोरोना व्हायरस फैलावावर नियंत्रण मिळत असलं तरीही अजूनही प्रत्येकाची या व्हायरस विरूद्ध लढाई सुरू आहे. अशामध्ये आता बॉलिवूड स्टार अमिर खानच्या स्टाफमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. आज (30 जून) आमिरने एक पत्रक जारी करत त्याबाबतची माहिती सोशल मीडीयामधून दिली आहे. माझ्या स्टाफमधील काहींमध्ये कोरोनाची लागण झाली आहे त्यांना क्वारंटीन करण्यात आलं आहे. सध्या ते बीएमसीच्या निगराणीखाली आहेत. त्यासाठी मी पालिकेचा आभारी आहे. आमची संपूर्ण सोसायटी सॅनिटाईज करण्यात आली आहे.

आमिर खानने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या कुटुंबाची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. सुदैवाने सार्‍यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. अजूनही अमिर खानच्या आईची कोरोना टेस्ट होणं बाकी आहे. दरम्यान ती देखील आज होईल. आईचा कोरोना रिपोर्ट देखील निगेटिव्ह येईल अशी प्रार्थना करा असं आवाहन आमिर खानने केलं आहे. दरम्यान या पत्रकामध्ये आमिर खानने कोकिलाबेन हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स यांचे आभार मानले आहेत.

आमिर खानचं स्टेटमेंट

दरम्यान याआधी करण  जोहर, बोनी कपूर या बॉलिवूड कलाकारांच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती आली होती. मात्र हे सारे कलाकार आणि त्यांचा परिवार कोरोनापासून दूर होता.

मुंबईमध्ये कोरोना विळखा आता पश्चिम उपनगरामध्ये अधिक घट्ट होत आहे. मुंबईत काल रात्री देण्यात आलेल्या माहितीनुसार 24 तासांत 1 हजार 247 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 21 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 76 हजार 294 वर पोहचली आहे. यापैंकी 4 हजार 461 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 43 हजार 545 जणांनी कोरोनावर मात केली आहे.