Ganesh Acharya (Photo Credits: Instagram)

रणवीर सिंह, श्रद्धा कपूर, वरुण धवन, कतरिना कैफ सारख्या बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सना आपल्या तालावर नाचावणारे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याविरोधात एका 33 वर्षीय महिलेने अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही महिला गणेश आचार्य यांच्यासोबत सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत होती. गणेश आचार्य हे आपल्याला चित्रपट क्षेत्रात काम मिळण्यास अडथळा आणण्यासह आपल्या अश्लील व्हिडिओ पाहण्यासाठी बळबजबरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच ते आपल्याला मानसिक छळही देत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

या पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, Indian Film & Television Choreographers Association चे सचिव असलेले नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आपला मानसिक छळ करत होते. तसेच आपल्या हुद्द्याचा वापर करुन आपल्याला या संघटनेमधून काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले ज्याच्या मुळे तिचे उत्पन्न बंद झाले. ती गणेश आचार्य यांच्या या संघटनेत सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत होती. इतकच नव्हे तर ती जेव्हा दुस-या नृत्य दिग्दर्शकाकडे काम मागण्यास जायची तेव्हा तिला आधी गणेश आचार्य सोबतची भांडणे मिटव आणि मगच आमच्याकडे ये असे सांगायचे. असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. याउलट गणेश आचार्य आपले मानसिक खच्चीकरण करायचे तसेच आपल्याला अश्लील व्हिडिओ पाहण्यासाठी जबरदस्ती करायचे असेही या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. अंबोली पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली असून अधिक तपास करीत आहे.

हेदेखील वाचा- #MeToo Movement: तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनतर गणेश आचार्य यांची पहिलीच प्रतिक्रिया

2018 मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने देखील गणेश आचार्यवर आपल्याशी गैरवर्तणूक आरोप केले होते. तनुश्री दत्ता हिने  #MeToo मोहिमेखाली आरोप केले होते की, अभिनेता नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर तिच्याशी गैरवर्तणूक केले. त्यानंतर या आरोपांची इतकी चर्चा झाली की, थेट नाना पाटेकर यांनाही प्रश्न विचारण्यात आले. या आरोपांमध्ये गणेश आचार्य यांनाही ओढत तनुश्रीने म्हटले होते की, नानाने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना सांगून गाण्यात जाणीवपूर्वक इंटीमेट स्टेप्स ठेवल्या होत्या. या प्रकाराला विरोध केल्यावर नाना पाटेकर यांनी तिला धमकी देण्यासाठी सेटवर गुंड बोलावले होते, असाही आरोप तनुश्रीने केला आहे.