
Actor Mukul Dev Dies: हिंदी चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते मुकुल देव (Mukul Dev) यांच निधन झालं आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. मुकुल देव यांनी वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, मुकुल देव यांचं शुक्रवारी 22 मे रोजी रात्री निधन झालं. शनिवारी त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या मित्रांना समजली तेव्हा ते त्यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची माहिती शोअर केल्यानंतर ही माहिती सर्वांसमोर आली. मुकुल देव यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
मुकुल देव यांच्या निधनाची बातमी समजताच मनोज बाजपेयी यांनी सोशल मीडियावर अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, 'मला जे वाटत आहे ते शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. मुकुल एका भावासारखा होता, एक कलाकार म्हणून त्याची आवड अतुलनीय होती. खूप लवकर तरुण असताना तो गेला. मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो. ओम शांती.'
मुकुल देव यांचा जन्म नवी दिल्ली येथे जालंधरजवळील एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरी देव हे सहाय्यक पोलिस आयुक्त होते आणि त्यांनीच मुकुल यांना अफगाण संस्कृतीची ओळख करून दिली. त्यांचे वडील पश्तो आणि पर्शियन भाषा बोलायचे. मुकुंद यांनी आठवीत असताना दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात मायकल जॅक्सन यांच्या डान्सची नक्कल करत सादरीकरण केलं, तेव्हा ते पहिल्यांदा मनोरंजनविश्वासोबत जोडले गेले. 'मुमकिन' (1996) या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनतर 'फियर फॅक्टर इंडिया'चा पहिला सीझन होस्ट केला. त्यांनी 'दस्तक' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ज्यामध्ये त्यांनी एसीपीची भूमिका साकारली होती.