गोविंदा आणि अरबाज खान (Photo Credits : Instagram)

गुरुवारी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. बाप्पांंमुळे घरात सुख, शांती, आनंद नांदावा. त्याच्या आशीर्वादाने सर्व मंगलमय व्हावे म्हणून १० दिवस गणपतीची घरात स्थापना केली जाते. सामान्य नागरिकांपासून ते मोठ मोठ्या सेलिब्रिटीपर्यंत हा सण सर्वजण धुमधडाक्यात साजरा करतात. बी-टाऊन मधील अनेक कलाकारांच्या घरीदेखील बाप्पांचे आगमन झाले. खरेतर बाप्पांच्या आशीर्वादाची गरज त्यांना देखील आहे. कारण बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहे ज्यांचा खूप काळापासून कोणताही चित्रपट पडद्यावर काही कमाल दाखवू शकला नाही, किंवा असे अनेक कलाकार आहेत ज्यांची सुरुवात तर जोरदार झाली मात्र या बॉलिवूडच्या रेसमध्ये ते टिकू शकले नाहीत. तर आशा करूया अशा कलाकारांवर देखील गणपतीची कृपा राहील आणि लवकरच त्यांचा एखादा हिट चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला तर पाहूया बॉलिवूडमध्ये असे कोणते कलाकार आहेत ज्यांना बाप्पांच्या आशीर्वादाची खरच गरज आहे.

तुषार कपूर –

गोलमालच्या सर्व भागांमधील एक महत्वाचा कलाकार. तुषार कपूर. गोलमाल तुषारसाठी एक चांगला ब्रेक ठरला यात काहीच शंका नाही, मात्र गोलमाल सोडून त्याचा दुसरा कुठला चित्रपट आठवतोय? नाही ना. कदाचित इतक्या जास्त गोलमाल मुळेच त्याचे करियर गोलमाल झाले असावे. २००१ मध्ये ‘मुझे कुछ केहना हैं’ द्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, पण गेल्या १७ वर्षांत त्याच्या बोटावर मोजण्याइतक्याच फिल्म्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

हरमन बावेजा –

लव्ह स्टोरी २०५० मधून हरमनने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. या चित्रपटामध्ये त्याच्या सोबत प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत होती. मात्र हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर फक्त ४ चित्रपट करून हरमन गायब झाला. २०१४ पासून हरमनचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही.

उदय चोप्रा –

यश चोप्रांच्या उदयने मोहब्बतें मधून करियरची सुरुवात केली. चित्रपट मल्टीस्टारर असल्याने सुपरहीट ठरला. त्यानंतर उदयच्या धूम चित्रपटाच्या सिरीजने लोकांचे फारच मनोरंजन केले, मात्र धूम सोडून दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात उदय चोप्राने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला नाही. आजही उदय चोप्राकडे एक फ्लॉप अॅक्टर म्हणूनच पहिले जाते.

फरदीन खान –

तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण फरदीन खानला त्याचा पहिला चित्रपट ‘प्रेम अगन’साठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर फरदीन काही चित्रपटांंमध्ये दिसला होता,  मात्र  मोजक्याच फिल्म्स सोडल्या तर गेल्या ८ वर्षांत फरदीनची एकही फिल्म पडद्यावर आलेली नाही.

झायेद खान –

संजय खानचा मुलगा झायेद ‘चुरा लिया हैं तुमने’द्वारे बॉलिवूडमध्ये आला. पहिल्या चित्रपटानंतर लगेच त्याला ‘मैं हु ना’सारखा दुसरा चित्रपट मिळाला जो हिट ठरला, मात्र त्यानंतर झायेदची क्वचित एखादी फिल्म असेल जी आपल्या लक्षात आहे. ‘शराफत गयी तेल लेने’ या २०१५च्या चित्रपटात त्याचे शेवटचे दर्शन झाले होते.

अरबाज खान –

आपला पहिला चित्रपट ‘दरार’साठी अरबाज ला ‘उत्कृष्ट खलनायका’चा फिल्मफेअर मिळाला होता. मात्र त्यानंतर अरबाजचे इंडस्ट्रीमधील स्थान टिकून राहिले ते फक्त त्याची स्वतःची निर्मिती असलेल्या दबंगमुळेच. २०१७च्या 'तेरा इंतजार' मध्ये अरबाज दिसला होता, मात्र हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला कळले देखील नाही. खूप वर्षांपासून एक अभिनेता म्हणून अरबाजने एकही हिट चित्रपट दिला नाही.

गोविंदा - 

एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेला गोविंदा कित्येक वर्षे लोकांचे मनोरंजन करत आहे, मात्र गेल्या काही वर्षांतील गोविंदाची एकही फिल्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही. २००९ सालची ‘लाईफ पार्टनर’ ही गोविंदाची शेवटची हिट फिल्म ठरली होती.