अक्षय कुमार आणि नरेंद्र मोदी (Photo Credits: File Photo)

नुकतीच अक्षय कुमारने (Akshay Kumar) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली. मुळात अक्षय कुमारने ही मुलाखत कशी घेतली हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र अक्षय कुमार आणि पंतप्रधान एकत्र कसे आले ही गोष्ट गुलदस्त्यातच राहिलेली बरी. तर आता योगायोगाने या मुलाखतीनंतर काही दिवसांतच भाजपने अक्षय कुमारचे दोन चित्रपट आपल्या नमो वाहिनीवर (NaMo TV) दाखवण्याचा घाट घातला आहे. याबाबत बीजेपीने निवडणूक आयोगाकडे एक पत्र लिहून परवानगी मागितली आहे.

अक्षय कुमारचे पॅडमॅन (Padman) आणि टॉयलेट एक प्रेम कथा (Toilet-Ek Prem Katha) हे दोन्ही चित्रपट फारच लोकप्रिय ठरले होते. हे दोन्ही चित्रपट सामाजिक विषयांवर आधारीत असल्याने हे चित्रपट आपल्या नमो टीव्हीवर दाखवले जावेत अशी भाजप पक्षाची इच्छा आहे. दिल्ली निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून याबाबत माहिती मागवली आहे. मात्र सध्या निवडणुकीच्या धामधुमीत अशा प्रकारचे चित्रपट एका पक्षाच्या वाहिनीवर दाखवले जावेत याबाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेईल ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(हेही वाचा: अक्षय कुमार याने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास मुलाखत; पहा Videos)

नमो टीव्हीवर कोणतेही कार्यक्रम प्रसारित केले जाण्यापूर्वी त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार या चित्रपटांबाबतही परवानगी मागितली आहे. भाजपने आतापर्यंत अशाप्रकारे विविध गोष्टींसाठी परवानगी घेण्यासाठी 308 अर्ज पाठवले आहेत. काँग्रेसने 120 अर्ज आणि आपने 23 अर्ज केले आहेत.