Avengers: Endgame चा नवा विक्रम; 6 लाखाला एक तिकीट, बुकिंग साईट्स झाल्या क्रॅश
Avengers: Endgame (Photo Credits: Marvel Studios)

माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ (Avengers: Endgame) हा 2019 मधील सर्वात मोठा चित्रपट येत्या 26 एप्रिलला भारतात प्रदर्शित होत आहे. तब्बल 32 सुपरहिरो असणाऱ्या या चित्रपटासाठी निर्मात्यांनी 1000 कोटी पेक्षा जास्त पैसा खर्च केला आहे. गेल्या वर्षी ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा त्याचाच पुढील भाग आहे. संपूर्ण जगातील या चित्रपटासाठीची क्रेझ पाहता या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु करण्यात आले आहे. मात्र त्याला चाहत्यांचा इतका प्रतिसाद मिळाला की चक्क बुकिंग साईट क्रॅश झाल्या.

नुकतेच एका व्यक्तीने ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’चे तिकीट पुनर्विक्रीसाठी काढले होते. ई-बे (eBay) या वेबसाईटवर या तिकीटाची विक्री होत होती. अमेरिकेत AMC चित्रपटगृहातील सहाव्या रांगेतील 84 क्रमांकाचे हे तिकीट आहे. या तिकीटाची किंमत चक्क 9 हजार 199 अमेरिकी डॉलर म्हणजेच 6 लाख 40 हजार रुपये ठेवण्यात आली होती. हे तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांचा अक्षरशः उड्या पडल्या. हे तिकीट मिळवण्यासाठी इतक्या लोकांनी या वेबसाईटला भेट दिली की ही वेबसाईट क्रॅश झाली. याआधी स्टार वॉर्स फ्रेंचाइजीच्या ‘स्टार वॉर्स- द फोर्स अवेकन्स’ आणि ‘स्टार्स वॉर्स- द लास्ट लेडी’ या दोन हॉलिवूड चित्रपटांच्या तिकिट विक्रीला असाच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. (हेही वाचा: Avengers 4 End Game Trailer: 'अॅव्हेंजर्स 4'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?)

दरम्यान नुकतेच ए. आर. रेहमानने संगीतबद्ध केलेले ‘मार्व्हल अँथम साँग’ रुसोने प्रदर्शित केले. ‘कॅप्टन माव्‍‌र्हल’ या चित्रपटाला भारतातील इतर शहरांच्या तुलनेने मुंबईकरांनी भरभरून दाद दिली होती. एकटय़ा मुंबईतच या चित्रपटाने 70 कोटी रुपयांची कमाई केली. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा माव्‍‌र्हलचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्या लांबीचा, म्हणजेच 3 तास 2 मिनिटांचा असणार आहे.