डॉ. काशिनाथ घाणेकर... मराठी रंगभूमीवरील एक अभिजात नट. मराठी नाटकांमधील पहिला सुपरस्टार अशी ओळख असलेल्या काशिनाथ घाणेकर यांचा आयुष्यपट उलगडणारा चित्रपट ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' येत्या दिवाळीत प्रदर्शित होत आहे. नुकताच सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचा दुसरा टीजर रिलीज करण्यात आला आहे. पहिल्या टीजरमध्ये चित्रपटामधील कलाकारांच्या ओळखी करून देण्यात आल्या आहेत. मात्र हा टीजर फक्त डॉक्टरांवर केंद्रित आहे.
‘काशिनाथ घाणेकर भारतीय रंगभूमीचा पहिला नव्हे अखेरचा सुपरस्टार आहे’, ‘आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा पहिल्यांदा सुरू केली ती काशिनाथनेच’ अशा दमदार संवादांच्या माध्यमातून मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं अतुलनीय योगदान, आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वैभवाचे दिवस कसे आणले हे या टीझरमध्ये पाहायला मिळतं.
सुबोध भावेसोबतच चित्रपटात सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.