Rajinikanth Health Update:  अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती स्थिर; आज अपोलो हॉस्पिटल मधून मिळणार डिस्चार्ज
Rajinikanth (Photo Credits: PTI)

दाक्षिणात्य सिनेमामधील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना हैदराबाद येथील अपोलो रूग्णालयामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे क्रिसमसच्या दिवशी दाखल करण्यात आले होते. थकवा आणि रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने त्यांनी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट केल्यानंतर आज 2 दिवसांनी त्यां ची प्रकृती स्थिर झाल्यानंतर अखेर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अपोलो रूग्णालयाकडून त्याचं पत्रक जारी करण्यात आलं आहे. रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

दरम्यान 25 डिसेंबरला 80 वर्षीय रजनीकांत यांच्या रक्तदाबामध्ये सातत्याने चढ -उतार होत होता. त्यामुळे काही वैद्यकीय चाचण्या आणि पूर्ण सक्तीचा आराम करण्यासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत यांच्या मेडिकल टेस्टमध्ये कोणतीच गंभीर बाब समोर न आल्याने आणि त्यांची प्रकृती उत्तम असल्याने आता त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र त्यांना आता आठवडाभर बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर पुढील काही दिवस फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रजनीकांत यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून त्यांच्या चाहत्यांसोबतच कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या होत्या. तामिळ सुपरस्टार रजनीकांत लवकरच स्थापन करणार आपला नवा राजकीय पक्ष, 31 डिसेंबरला करणार मोठी घोषणा.

रजनीकांत हे अभिनेते असले तरीही ते आता राजकीय कारकीर्द सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहेत. येत्या 31 डिसेंबरला रजनीकांत त्यांच्या राजकीय पक्षाबाबतची महत्त्वाची घोषणा करणार आहे. ते त्यांचा स्वतःचा पक्ष स्थापन करणार आहेत. तसेच पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणूकीतही ते सार्‍या 234 जागा लढवणार आहेत.