अभिनेता मिथुन चक्रवर्ती उपचारांसाठी अमेरिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल; जाणून घ्या काय आहे आजार
मिथुन चक्रवर्ती (Photo credit : youtube)

नुकतेच कादर खान (Kader Khan) यांच्या आजारपणाची बातमी आली होती, त्यानंतर आता अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) उपचारासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. पाठदुखीच्या त्रासाने ग्रस्त असलेले मिथुन, लॉस एंजलिसच्या एका रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती आणि सून मदालासा शर्माही अमेरिकेत आहेत. गेले काही महिने त्यांना पाठदुखीचा त्रास होता. त्यामुळे कुटुंबाने त्यांना अमेरिकेत हलवले. पुढचे काही दिवस मिथुन यांना हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल.

2009 साली लक (Luck) चित्रपटाचे शुटींग करताना झालेल्या दुखापतीमुळे मिथुन चक्रवर्ती यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर परत 2016 मध्ये त्यांना याच गोष्टीसाठी ट्रीटमेंट घ्यावी लागली होती. 2018 मध्ये त्यांचा हा त्रास कमी झाला होता, म्हणूनच ते छोट्या पडद्यावरील एक शो होस्ट करू शकले.

मिथुन यांनी 1976 मध्ये आलेल्या मृगया या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 1982 मध्ये आलेला डिस्को डान्सर हा सर्वात हिट सिनेमा ठरला. आगामी जीनियस (Genius) या चित्रपटात ते दिसणार आहेत तसेच राम गोपाल वर्मा यांच्यासोबत एका भयपटातही ते दिसून येतील.