Jackie Shroff Moves Delhi HC : जॅकी श्रॉफ यांची उच्च न्यायालयात धाव; नाव, आवाज, फोटोंचा गैरवापर केल्याचा आरोप, विविध संस्थांविरुद्ध खटला दाखल
Photo Credit -Instagram

Jackie Shroff Moves Delhi HC : बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Bollywood Actor Jackie Shroff )यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्काचे संरक्षण (Personality Rights)करण्यासाठी आणि त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव ‘भिडू’ वापरण्यास प्रतिबंध करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी, जॅकी श्रॉफ यांनी त्यांचे नाव, फोटो, आवाज आणि टोपणनाव 'भिडू' वापरल्या प्रकरणी विविध संस्थांविरोधात खटला दाखल केला आहे. हे प्रकरण उद्या, १५ मे रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. उद्याच्या सुनावणीच्या आधारे न्यायालय अंतरिम आदेश देण्याचा विचार करेल. (हेही वाचा:Salman Khan House Firing Case: सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून अटक )

जॅकी श्रॉफ यांच्या वकिलांनी न्यायालयाला असेही सांगितले की "काही घटनांमध्ये, त्याच्या प्रतिमांचा वापर करून आक्षेपार्ह मीम्स बनवले गेले आहेत. त्यांच्या आवाजाचा देखील गैरवापर केला गेला आहे. काही प्रकरणांमध्ये श्रॉफ यांचे फोटो वापरून अश्लील फोटो तयार केले जात आहेत.

दरम्यान, एका बॉलीवूड अभिनेत्याने त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी अनिल कपूर यांनीही आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर अनिल कपूर यांनी जानेवारीत त्याबाबतची केस जिंकली. त्यामुळे त्यांचे नाव, आवाज, प्रतिमा, समानता, बोलण्याची पद्धत आणि हावभाव आणि अगदी 'झक्कास' शब्दाचे संरक्षण झाले आहे.

जॅकी श्रॉफ यांनी सांगितले की, “एआय तंत्रज्ञान दररोज विकसित होत आहे. ते फक्त माझ्यासाठी नाही. आज मी स्वतःचे रक्षण करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. पण जेव्हा मी तिथे नसतो तेव्हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचे संरक्षण करण्याचा आणि भविष्यात त्याचा फायदा घेण्याचा अधिकार कुटुंबाला मिळायला हवा."