Salman Khan House Firing Case: सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून अटक
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सहाव्या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला हरियाणामधून अटक करण्यात आली आहे.
Salman Khan House Firing Case : सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक केली होती. आता हरियाणातील फतेहाबाद येथून आणखी एकाला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून एकाला अटक केली होती. हरपाल सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो 37 वर्षांचा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (हेही वाचा:Salman Khan House Firing: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी)
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपी हरपाल सिंग याने या प्रकरणात अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती. त्याशिवाय, रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. दरम्यान, पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरी याने या प्रकरणात अटक केलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना पैसे आणि रेकी करण्यासाठी मदत केली होती.
गोळीबाराच्या घटनेचा इतिहास
14 एप्रिल 2024 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2024 12:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

