Triton Model H (Photo Credits: Facebook)

अमेरिकेच्या ट्रायटन ईव्हीने (Triton EV) भारतात आपली नवी इलेक्ट्रीक कार सादर केली आहे. मॉडल एच (Model H) इलेक्ट्रिक एसयूव्ही असे या कारचे नाव असून भारतात लॉन्च होणारी ही पहिली कार आहे. Triton Model H ही कार अमेरिकन एसयुव्ही सारखी दिसते. यात चंकी फ्रंट फेस आणि मोठा ग्रिल आहे. या कारची लांबी 5,690 मिमी, उंची 2057 मिमी आणि रुंदी 1880 मिमी इतकी आहे. तर याचा व्हिलबेस सुमारे 3,302 मिमी इतका आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यात 8 प्रवासी प्रवास करु शकतात. याशिवाय यात 5,663 लीटर क्षमतेची सामान ठेवण्यासाठी जागा आहे. ही कार 7 रंगांमध्ये सादर केली जाईल. यात 200kWh बॅटरी हायपरचार्जच्या पर्यायासह देण्यात आली आहे. ही कार अवघ्या 2 तासांत पूर्णपणे चार्ज करता येईल. त्याचबरोबर एकदा चार्ज केल्यानंतर 1200 किमी ड्रायव्हिंग रेंज देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

कंपनीचा हा दावा खरा ठरल्यास इलेक्ट्रिक चार्जवर 1000 किमीची रेंज ओलांडण्यास सक्षम असणारी ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार असेल आणि जागतिक स्तरावरही निश्चितपणे सर्वात जास्त रेंज देणारी EV ठरेल. दरम्यान, भारतातून 2.4 अब्ज डॉलर किंमतीच्या खरेदी ऑर्डर मिळाल्या असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

ही कार तयार करण्यासाठी तेलंगणा येथे एक फॅसिलिटी उभारण्यात येणार आहे. ट्रायटनची इलेक्ट्रीक कार बनवणारी ही भारतातील पहिली फॅसिलिटी असेल. भारत हे इलेक्ट्रीक कारच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असल्यामुळे भारतामध्ये उत्पादीत झालेली इलेक्ट्रीक कार मार्केटमध्ये आणण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी तेलंगणातील झहिराबाद फॅक्टरीमधून या गाडीचे उत्पादन होईल, अशी माहिती ट्रायटन इलेक्ट्रीक व्हेहिकलचे मॅनेजिंग डायरेक्टर हिमांशू पटेल यांनी दिली.