आपला आलिशान लुक आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त इलेक्ट्रिक कारसाठी (Electric Automaker) ओळखल्या जाणार्या, जगभरातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी टेस्लाने (Tesla) पुन्हा एकदा हॅकर्सना (Hackers) आव्हान केले आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या मॉडेल 3 (Model 3) कारची घोषणा केली, त्यानुसार ही कार हॅक करणे अशक्य आहे असे म्हटले जात आहे.
आता टेस्लाने लोकांसमोर एक आव्हान ठेवले आहे, ज्याद्वारे ही गाडी हॅक केल्यास 74 लाख रुपयांची टेस्ला मॉडेल 3 कार आणि 7 कोटी रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. टेस्लाच्या या स्पर्धेचे नाव ‘पीडब्ल्यूएन20डब्ल्यूएन’ (Pwn20wn) असे आहे. ही स्पर्धा मार्चमध्ये कॅनडाच्या व्हँकुव्हर शहरात होणार आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात टेस्लाने आयोजित केलेल्या अशाच एका स्पर्धेत, एका गटाने टेस्ला मॉडेल 3 कार आणि सुमारे 25 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले होते. यंदाच्या टेस्लाच्या या स्पर्धेत केवळ हॅकर्सच सहभागी होऊ शकतील. कंपनीने आपल्या कनेक्टेड कारला कोणत्याही प्रकारे हॅक करण्यात हॅकर्स यशस्वी झाले तर, तर त्यांना टेस्ला मॉडेल 3 कार आणि 7 कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीनुसार, अशी हॅकिंग स्पर्धा ही एक चाचणी आहे, जी सुरक्षा प्रणाली सुधारण्यासाठी मदत करते. यामुळे कंपनी त्यांच्या सिस्टममध्ये येणाऱ्या अडचण दूर करू शकते. (हेही वाचा: MG Motor भारतात करणार 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक; MG eZs इलेक्ट्रिक एसयूव्हीसह, बाजारात आणणार 4 नवीन मॉडेल्स)
गेल्या वर्षी मार्चमध्ये अमॅट कामा आणि रिचर्ड झू यांची टीम Fluoroacetate ने टेस्लाच्या हॅकिंग स्पर्धेदरम्यान वाहन यंत्रणा हॅक केली होती. हॅकर्सच्या या गटाने कारच्या इन्फोटेनमेंट सिस्टमला लक्ष्य केले होते. दरम्यान, टेस्ला मॉडेल 3 ही एक लक्झरी इलेक्ट्रिक सेडान कार आहे आणि ती दोन वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. याचे लो ड्रायव्हिंग व्हर्जन 402 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज प्रदान करते आणि हाय ड्रायव्हिंग व्हर्जन 518 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज प्रदान करते. त्याच्या विशेष तंत्रज्ञानामुळे आणि वैशिष्ट्यांमुळे ही कार जगभरात प्रसिद्ध आहे.