2021 पर्यंत मुंबईत 200 तर, संपूर्ण देशात 700 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे Tata Power चे लक्ष्य
Charging Stations (Photo Credits: Twitter|Autocar Professional)

सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) पसंती मिळत असलेली दिसून येत आहे. पेट्रोल आणि डीझेलचे भाव दररोज गगनाला भिडत आहेत, अशावेळी लोक इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भर देत आहेत. मात्र यामध्ये एक समस्या आहे ती ही वाहने चार्ज (Charging) करणे. तर आता पुढच्या वर्षीपर्यंत इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशनचे (Charging Stations) नेटवर्क 700 पर्यंत वाढविण्याच्या योजनेवर टाटा पॉवर (Tata Power)  काम करत आहे.

कंपनी पुढील वर्षापर्यंत देशभरात 700 तर मुंबईमध्ये (Mumbai) 200 चार्जिंग स्टेशन सुरू करणार आहे. टाटा पॉवरने दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि हैदराबादसह अनेक शहरांमध्ये यापूर्वी 100 फास्ट चार्जिंग स्टेशन स्थापित केले आहेत.

प्रथम, टाटा पॉवरने मार्च 2020 पर्यंत आपल्या ई-वाहन चार्जिंग स्टेशनची संख्या 300 वर नेण्याची योजना आखली आहे. टाटा पॉवरच्या या योजनेमुळे ई-वाहनांच्या चार्जिंगची सुविधा वाढेल. तसेच, देशातील ई-वाहनांची संख्या वाढविण्यातही ही मदत होईल. देशात ई-वाहनांची संख्या वाढविण्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी दर 12% वरून 5% पर्यंत कमी केला आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगतात, 'आम्ही ज्या ठिकाणी ईव्ही सुरू केले आहेत त्या ठिकाणी मॅपिंग करीत आहोत आणि त्या शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू करू. पुढील वर्षी ही संख्या सुमारे 700 वर नेण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.'

(हेही वाचा: खुशखबर! इलेक्ट्रिक वाहने झाली स्वस्त; GST मध्ये मोठी कपात, केंद्र सरकारचा मोठा निर्णय)

कंपनी फक्त सार्वजनिक ठिकाणी फोकस असलेले होम ईव्ही चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देणार आहे. होम चार्जिंगसह मेट्रो स्टेशन, शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे आणि महामार्गांवर चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण केली जाणार आहे. टाटा पॉवरने हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि इंद्रप्रस्थ गॅसच्या किरकोळ दुकानात ई-वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे करार केले आहेत.