खुशखबर! टाटा मोटर्स 'या' दिवशी सादर करणार आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही Tata Nexon EV; जाणून घ्या वैशिष्ठ्ये आणि किंमत
Tata Nexon EV (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Car) लाइनअपमध्ये आणखी एक नवीन नाव जोडले जाणार आहे. देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) देशातील सर्वात मजबूत इलेक्ट्रिक एसयूव्ही, टाटा नेक्सन (Tata Nexon EV) जनतेसमोर सादर करणार आहे. 19 डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजारात ही गाडी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी ही गाडी 17 डिसेंबर रोजी सादर केली जाणार होती, परंतु काही कारणांमुळे कंपनीने तिची मुदत वाढविली आहे. कंपनी आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही वेगवेगळ्या टप्प्यात सादर करेल. पहिल्या टप्प्यात ही नेक्सन ईव्ही दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकाता यासारख्या शहरांमध्ये सादर केली जाईल.

पुढील टप्प्यात ही गाडी देशातील इतर शहरांमध्ये उपलब्ध होईल. या एसयूव्हीचे फ्रंट डिझाईन त्याच्या पेट्रोल आणि डिझेल आवृत्त्यांपेक्षा थोडे वेगळे असेल. नेक्सन ईव्ही ही कंपनीची नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञान असलेली पहिली इलेक्ट्रिक कार असेल. यासह, नेक्सन ईव्हीमध्ये नेक्सन फेसलिफ्टची रचना देखील असणार आहे. नेक्सन ईव्हीची किंमत 15 लाख ते 17 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवली जाईल. किंमतीच्या बाबतीत, नेक्सन त्याच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी ह्युंदाई कोना (Hyundai Kona) आणि एमजी झेडएस ईव्ही (MG ZS EV) पेक्षा खूपच कमी आहे. झेडएस ईव्ही भारतात 5 डिसेंबर 2019 ला सादर केली गेली. (हेही वाचा: Royal Enfield लवकरच आणणार इलेक्ट्रिक मोटरसायकल)

या गाडीमध्ये नवीन फॉग लँप क्लस्टर, हॅरियरशी मिळतेजुळते फ्रंट ग्रिल आणि नवीन डेटाइम रनिंग हेडलाइटचा प्रयोग केला गेला आहे. नेक्सन इलेक्ट्रिकमध्ये कंपनीने झिपट्रॉन (Ziptron) तंत्रज्ञान वापरले आहे. या एसयूव्हीची नुकतीच लेह आणि मनालीमधील दुर्गम मार्गांवरही चाचणी घेण्यात आली. कंपनीचे म्हणणे आहे की नेक्सन ईव्ही एकदा संपूर्ण चार्ज केल्यास सुमारे 300 किमी धावू शकते. या गाडीचा वर्ल्ड प्रीमियर मुंबईत आयोजित केला आहे. पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये ही गाडी अधिकृतपणे विक्रीसाठी ठेवली जाईल.