1 एप्रिलपासून टाटा कंपनीच्या गाड्या 25,000 रुपयांनी महागणार
Tata Tigor Buzz Edition (Photo Credits: Tata Official Website)

टाटा कंपनीच्या (Tata Motors) कार्स महागणार असून 1 एप्रिल पासून टाटा कार्सची किंमत तब्बल 25 हजार रुपयांनी वाढणार आहे. कार निर्मिती खर्च आणि आर्थिक परिस्थितींचा सामना करण्यासाठी कारच्या किंमत वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. यापूर्वी टोयोटा आणि जगुआर लँड रोवर या निवडक गाड्यांच्या किंमतीत एप्रिलपासून वाढ होणार असल्याचे कंपनीने सांगितले होते.

कारच्या किंमत वाढीच्या निर्णयाबद्दल टाटा मोटर्सचे अध्यक्ष मयंक पारीक यांनी सांगितले की, "बाजारातील बदललेली परिस्थिती, कारचा निर्मिती खर्च आणि इतर आर्थिक कारणांमुळे कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला."

टाटा मोटर्स विविध कार्सची विक्री करतात. यात टियागो, टोगोर, हेक्सा आणि हॅरियर या कार्सचा समावेश असून याच्या किंमती 2.36 लाखांपासून 18.37 लाखांपर्यंत आहेत. या सर्व गाड्यांची किंमत 1 एप्रिलपासून 25 हजार रुपयांनी वाढणार आहे.

त्याचबरोबर काही ऑफर्स देखील कंपनी देत आहे. देशभरात चार टाटा मॉडेलवर - टिगार, हेक्सा, नेक्सन आणि टियागोवर रोख सवलत मिळत आहेत. टाटा हेक्झावर सुमारे 1.05 लाख रुपयांची सवलत मिळेल. शिवाय टोगोर, टियागो आणि नेक्सन विकत घेण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना अनुक्रमे 74,000, 60,000 आणि 1.04 लाख रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट मिळेल.