जर तुम्ही नवीन वर्ष 2024 मध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) पुढील वर्षापासून कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किमती जानेवारी 2024 पासून लागू होतील. जर तुम्ही मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमचे बजेट वाढवण्याची तयारी करा. वाढत्या खर्चामुळे कंपनीवर दबाव असल्याचे कंपनीने म्हटले आहे. महागाई आणि वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ पाहता कंपनीला आपल्या कारच्या किंमती वाढवण्याचा हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी स्वस्त कारपासून प्रीमियम एमपीव्ही कारपर्यंत अनेक मॉडेल्स विकते. यामध्ये मारुती अल्टो ते इविक्टो यांचा समावेश आहे, ज्यांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 3.54 लाख आणि 28.42 लाख रुपये आहे. आता या गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत. मात्र, मारुती सुझुकीने गाड्यांच्या किमती किती वाढवल्या जाणार याचा खुलासा केलेला नाही.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) फाइलिंगमध्ये, मारुती सुझुकीने सांगितले की कंपनी जानेवारी 2024 पासून कारच्या किमती वाढवण्याची योजना आखत आहे. वाढती महागाई आणि वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे कंपनीवर खर्च वाढवण्याचा दबाव होता, त्यामुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले. मॉडेलनुसार वाढीचे दर बदलतील. मारुती सुझुकी देशात सर्वाधिक गाड्या विकते. त्याचे WagonR, Baleno, Alto सारखे मॉडेल भारतात खूप पसंत केले जातात. (हेही वाचा: Amazon Online Car Sales- Hyundai: अमेझॉनवर मिळणार ह्युंदाई कार, वाचा सविस्तर)
दरम्यान, यापूर्वी जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीनेही कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. ऑडीने सांगितले की, इनपुट आणि ऑपरेशनचा वाढता खर्च पाहता कंपनी पुढील वर्षी जानेवारीपासून भारतात कारच्या किमती वाढवणार आहे. हा जर्मन ब्रँड आपल्या कारच्या किमती 2 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. ऑडी इंडिया 1 जानेवारी 2024 पासून नवीन किमती लागू करेल.