Driving License संदर्भातील 'या' नियमात मोठा बदल; आता रविवारीही करू शकता 'हे' काम, वाचा सविस्तर
Driving License | Representational Image (File Photo)

Driving License New Rules: ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नियम दिवसेंदिवस अधिक सुलभ करण्यात येत आहेत. परिणामी नागरिक सहजपणे वाहन चालविण्याचा परवाना घेऊ शकतात. अलीकडेचं देशातील बर्‍याच राज्यांत वाहन चालविण्याचा परवाना प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली होती. आता लोकांच्या सोयी लक्षात घेऊन रविवारी दिल्लीत ड्रायव्हिंग टेस्ट (Driving Test) सुरू केली जात आहे. कामाच्या व्यक्त शेड्यूलमुळे अनेकजण वाहन चालविण्याच्या चाचणीसाठी वेळ देऊ शकत नव्हते. परंतु आता या नवीन नियमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिवहन विभागानेही रविवारी राजधानीच्या सर्व 13 प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) ड्रायव्हिंग चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आता रविवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद असूनही अर्जदारांना ड्रायव्हिंग टेस्टसाठी स्लॉट बुक करता येणार आहे. परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांच्या मान्यतेने गेल्या शुक्रवारी जारी केलेल्या आदेशात असं म्हटलं होतं की, वाहन चालविण्यास परवान्यासाठी अर्जदारांच्या सोयीची काळजी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आता आरटीओ कार्यालय रविवारीदेखील खुली असतील. मात्र त्या दिवशी ड्रायव्हिंग टेस्ट व्यतिरिक्त कार्यालयात इतर कोणतीही सेवा दिली जाणार नाही.  (वाचा - Summer Bike Riding Tips: उन्हाळ्यात बाईक चालवताना 'या' गोष्टी जरुर तुमच्यासोबत ठेवा)

सोमवारी स्लॉट बुक होणार नाही -

या नव्या आदेशासह रविवारी काम करणाऱ्या चाचणी निरीक्षक व इतर आरटीओ कर्मचार्‍यांना सोमवारी त्यांची साप्ताहिक रजा घेण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अर्जदारांना सोमवारी ऑनलाईन स्लॉट बुक करता येणार नाही.

याशिवाय, ज्या अर्जदारांनी यापूर्वीच सोमवारी स्लॉट बुक केला आहे, ते सोमवारी ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकतात. यासाठी पर्यायी निरीक्षक आणि कर्मचारी नियुक्त केले जातील. सध्या हा नियम फक्त दिल्लीतचं लागू करण्यात आला आहे. लवकरचं अन्य राज्यातही याची अंमलबजावणी होणार आहे.