प्रतिकात्मक फोटो | Driving (Photo Credits: Unsplash)

रस्त्याच्या चुकीच्या बाजूने (wrong way) गाडी चालवताना दोनदा पकडले गेल्यास आजीवन ड्रायव्हिंगवर बंदी घालण्याचा  निर्णय अहमदाबाद वाहतुक पोलिसांनी आणि रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (Regional Transport Office) यांनी एकत्रितरित्या घेतला आहे.

चुकीच्या बाजूने गाडी चालवणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर वाहतुक पोलिसांनी एफआयआर (FIR)  दाखल केल्यास आरटीओ (RTO) त्या व्यक्तीचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करेल आणि त्या व्यक्तीचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये दाखल करण्यात येईल.

रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवताना पहिल्यांदा पकडले गेल्यास वाहतुक पोलिसांकडून त्याची नोंद घेतली जाईल आणि तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी त्या व्यक्तीचा परवाना रद्द करण्यात येईल. त्याच व्यक्तीने जर पुन्हा हीच चूक केल्यास त्याचा परवाना आरटीओकडून कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल.

पूर्वी वाहतुकीच्या नियमांचे पाच वेळा उल्लंघन केल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात येत होते. पण बदललेल्या नियमांनुसार आता वाहतुकीच्या नियमांचे दोन वेळा उल्लंघन केल्यास वाहतुक पोलीस आरटीओला लायसन्स रद्द करण्याची शिफारस करु शकतात, असे डीसीपी (ट्रॅफिक) संजय खरात यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगतिले. नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत सात ड्रायव्हींग लायसन्स रद्द केले आहेत.