Hero MotoCorp Logo (Photo Credits: Official Website)

Hero MotoCorp Announces Price Hike: देशातील आघाडीची दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) पुढील महिन्यात ग्राहकांना मोठा झटका देणार आहे. हीरो मोटोकॉर्पने 1 जुलै 2024 पासून त्यांच्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंट्सवर वेगवेगळी असेल, याचा अर्थ पुढील महिन्यापासून तुम्हाला हिरो कंपनीच्या दुचाकींसाठी अधिक खर्च करावा लागेल. एक्स-शोरूम किंमतीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. सोमवारी याची घोषणा करताना कंपनीने सांगितले की, उत्पादन खर्च जास्त असल्याने हे पाऊल उचलावे लागले. वाढ मॉडेल आणि बाजारपेठेनुसार बदलू शकते.

हीरो मोटोकॉर्प भारतीय बाजारपेठेत 10 कम्युटर बाइक्स, 4 स्पोर्ट्स बाइक्स, 2 ॲडव्हेंचर टूरर बाइक्स, एक स्पोर्ट्स नेकेड, एक क्रूझर आणि एक ऑफ-रोड मोटरसायकल तसेच 4 स्कूटर विकते. नेहमीप्रमाणे, Hero Splendor ही गेल्या महिन्यात म्हणजेच मे 2024 मध्ये सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल होती, परंतु हीरो मोटोकॉर्प कंपनी स्कूटर विभागात मागे पडली आहे. गेल्या महिन्यातील टॉप 10 स्कूटरमध्ये हिरोची एकही स्कूटर नव्हती.

हीरो मोटोकॉर्पने शेअर बाजाराला सांगितले की, बाइक आणि स्कूटरच्या किमतीत 1500 रुपयांपर्यंत वाढ केली जाईल. दुसरीकडे सोमवारी दुपारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स 0.68 टक्क्यांच्या वाढीसह 5,489.05 रुपयांवर व्यवहार करताना दिसले. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,894.30 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांचा नीचांक रु. 2,768.55 आहे. सोमवारी बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप 1,09,743.19 कोटी रुपयांवर बंद झाले. (हेही वाचा: E-Bike Blast: सुरतमध्ये ई-बाईकचा स्फोट; 18 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, 4 जण जखमी, रात्रभर चार्जिंगला लावली होती गाडी)

दरम्यान याआधी देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी (Automobile Company) टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या ग्राहकांना झटका देत, आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सची वाहने जवळपास 2 टक्क्यांनी महागणार आहेत. नवीन दर 1 जुलैपासून लागू होणार आहेत. टाटा मोटर्सने मागील बुधवारी सांगितले की, वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आपल्या वाहनांचे दर वाढवावे लागले आहेत.