Harley-Davidson ‘Serial 1': हार्ले डेव्हिडसनने सादर केली Electric Bicycle; जाणून घ्या काय आहे खास
Harley-Davidson ‘Serial 1 Bicycle (Photo Credits: IANS)

हार्ले डेव्हिडसनने (Harley-Davidson) एक दमदार इलेक्ट्रिक बाईक (Electric Bicycle) बाजारात आणली आहे. याला आपण त्यास इलेक्ट्रिक सायकल देखील म्हणू शकतो. आगामी काळात हार्ले डेव्हिडसन सिरियल 1 (Serial 1) सायकल कंपनीच्या नावाने आपला ‘ई बाइक’ विभाग स्थिर करू शकेल. ही सायकल लूकच्या बाबतीत इतर सायकलपेक्षा वेगळी नाही. या सायकलसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली असून ते ही सायकल तयार करतील. 1903 मध्ये हार्ले डेव्हिसनच्या सर्वात जुन्या मोटारसायकलचे नाव सिरियल नंबर वन (Serial Number One) होते. यामुळेच कंपनीने या सायकलचे नावही सीरियल 1 देखील ठेवले आहे.

फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे सीरियल 1 मध्ये पांढरे टायर्स देण्यात आले आहेत. यामध्ये पारंपारिक चेनसोबत पेडल देखील देण्यात आले आहे. यात फ्रेम इंटिग्रेटेड बॅटरी, फ्रेम इंटिग्रेटेड हेडलाइट आणि टेललाईट आहेत. कंपनीने सीरियल 1 सायकलसाठी एक खास वेबसाइट देखील तयार केली आहे. हार्ले डेव्हिडसन सीरियल 1 सायकल वेबसाइटवर जो काउंटडाउन टायमर आहे तो, 16 नोव्हेंबर पर्यंत आहे. 16 नोव्हेंबरला कंपनी या सायकलबद्दल अधिक माहिती शेअर करू शकते. (हेही वाचा: Ducati ची दमदार बाइक Multistrada 950 S चे बुकिंग सुरु, येत्या 2 नोव्हेंबरला होणार लॉन्च)

हार्ले डेव्हिडसनच्या म्हणण्यानुसार, सीरियल 1 ईसायकल ही दूरचे अंतर अगदी वेगाने पार करण्यास सक्षम असेल. ही सायकल शहरी प्रवासासाठी सर्वोत्तम उपाय असेल. ही सायकल नक्की कसे कार्य करेल व ती कधी बाजारात उपलब्ध होईल हे कंपनी नोव्हेंबरमध्ये सांगेल. दरम्यान, हार्ले डेव्हिडसन काही काळ भारत सोडण्याच्या तयारीत होते. पण आता कंपनीने भारतीय बाईक निर्माता हीरो मोटोकार्पशी भागीदारी केली आहे. म्हणजेच, सध्याच्या काळात ही कंपनी भारतातच राहणार आहे आणि हीरो मोटोकॉर्पशी टीम बनवून आपला व्यवसाय आणखी वाढवेल.