लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने (Mercedes-Benz) कोरोना विषाणूची (Coronavirus) सध्याची परिस्थिती पाहता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मदतीसाठी तात्पुरते रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी पुण्या (Pune) जवळ हे हॉस्पिटल बनवणार आहे जिथे 1500 बेड्सची व्यवस्था केली जाईल. हे संपूर्ण हॉस्पिटल एखाद्या आयसोलेशन वॉर्डसारखे काम करेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा आयसोलेशन वॉर्ड पुण्याजवळील महाळुंगे-इंगळे गावात असेल, ज्यासाठी कंपनी जिल्हा परिषदेचीही मदत घेणार आहे. यासह मदत म्हणून मर्सिडीज बेंझ (इंडिया) च्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने म्हटले आहे की, हा आयसोलेशन वॉर्ड खास कोरोना व्हायरस रूग्णांसाठी असेल आणि त्यासाठी नुकतेच 374 नवीन खोल्या विकसित केलेल्या म्हाडाकडूनही मदत घेण्यात येणार आहे. कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, हा वॉर्ड चाकणजवळ असेल जो एक प्रकारचा ऑटो हब आहे. कोरोना व्हायरसचा धोका टळल्यावर या ठिकाणाची सर्व वैद्यकीय उपकरणे, खेड येथील सिव्हिल हॉस्पिटलला दान करण्यात येतील. तर आयसोलेशन वॉर्डची मालमत्ता आदिवासी युवा वसतिगृहाला दान केली जाईल. मर्सडीज बेंग इंडियाने सांगितले की त्याच्याबरोबर ते ग्रॅंड मेडिकल फाउंडेशनलाही मदत करणार आहेत.
खेड आणि विमान नगर येथील दारिद्र्य रेषेखालील 1500 मजुरांना कंपनी दररोज शिधा व इतर वस्तू पुरवत आहे. मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन शेवेंक म्हणाले की, ‘या कठीण काळात आम्ही स्थानिक लोक आणि स्थानिक प्राधिकरणाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या नवीन वैद्यकीय सुविधांमुळे आगामी काळात येथील आरोग्य सुविधा अधिक चांगली होईल.’
कोरोनाशी चालू असलेल्या या लढाईमध्ये अनेक वाहन कंपन्या सहकार्यासाठी पुढे आल्या आहेत. मारुती सुझुकी आणि महिंद्रा यांनी व्हेंटिलेटर बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. वैद्यकीय सेवेसाठी महिंद्रा फेस शिल्डही बनवत आहे. कंपनीने आपल्या कांदिवली प्लांटमध्ये 30 मार्चपासून याचे उत्पादन सुरू केले आहे.