Kinetic Luna (संग्रहित संपादित प्रतिमा)

Kinetic e-Luna: साधारण 1970-80 च्या दशकात, 50 सीसी इंजिन असलेली लुना (Kinetic Luna) ही दुचाकी भारतातील घराघरात लोकप्रिय झाली होती. सायकल आणि मोटारसायकलचे मिश्रण असलेल्या लुनाची रचना स्त्री आणि पुरुष अशा दोघांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केली होती. त्या वेळी ही गाडी केवळ 2000 रुपयांच्या किमतीत बाजारात आणली गेली होती आणि जवळपास 28 वर्षे भारतातील मोपेड सेगमेंट मार्केटवर याने 95 टक्के मार्केट शेअर मिळवून राज्य केले होते. मात्र कंपनीने 21 व्या शतकाच्या पहिल्या वर्षी 2000 मध्ये याचे उत्पादन बंद केले. आता ही दुचाकी इलेक्ट्रिक वाहनाच्या स्वरूपात येणार आहे.

यशाच्या शिखरावर असताना कंपनीने एका दिवसात या दुचाकीचे 2000 युनिट्स विकले होते. कंपनीने तीन दशकांच्या कालावधीत 5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली. आता जवळपास तीन दशकांनंतर पुण्याच्या कायनेटिक ग्रीनने आपली लोकप्रिय मोपेड लुना इलेक्ट्रिक अवतारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. नवीन अवतार मॉडेलचे इंजिन आणि लूक पूर्णपणे नवीन असेल.

अग्रगण्य जाहिरात व्यावसायिक पीयूष पांडे यांनी भारतातील लोकप्रिय राइड कायनेटिक लुना इलेक्ट्रिक अवतारात सादर करण्यासाठी 'चल मेरी लुना' मोहीम पुन्हा सुरू केली आहे. कॉपीरायटर पीयूष पांडे यांनी 1959 मध्ये आलेल्या 'चिराग कहाँ, रोशनी कहां' या चित्रपटातील 'चल मेरे घोडे टिक टिक टिक' या गाण्यावर आधारित 'चल मेरी लुना' या मोहिमेद्वारे त्यांच्या कारकिर्दीचा पहिला प्रकल्प केला होता. 'चल मेरी लुना' आणि 'राइड टू सक्सेस, लुना' या त्यांच्या मोहिमेच्या टॅग लाइन होत्या. आता याच पियुष पांडेने पुन्हा एकदा ई-लुना लोकप्रिय करण्यासाठी आपली मोहीम सुरू केली आहे.

पीयूष पांडे ओगिल्वी येथे सल्लागार म्हणून कार्यरत होते. जवळपास 41 वर्षे या कंपनीशी संलग्न राहिल्यानंतर ते पुन्हा एकदा कायनेटिक ग्रीनमध्ये सामील झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 68 वर्षीय पीयूष पांडे यांनी 1 जानेवारी 2024 रोजी भारतातील क्रिएटिव्ह ऑफिसर आणि ओगिल्वीचे कार्यकारी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अहवालात असे सांगण्यात आले आहे की, कायनेटिक ई-लुनाचे पहिले डिझाईन 26 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. (हेही वाचा: Royal Enfield Shotgun 650: रॉयल एन्फिल्डची नवी पॉवरफुल बाइक लाँच, जाणून घ्या किंमत)

कायनेटिक ग्रीन ई-लुनाची छायाचित्रे इंटरनेटवर समोर आली आहेत. कायनेटिक ग्रीन ई-लुनाचा हाय स्पीड 50 किमी प्रति तास असेल असे सांगण्यात येत आहे. FAME-2 योजनेअंतर्गत त्याच्या खरेदीवर सबसिडी देखील दिली जाईल. बाजारात आल्यानंतर त्याची किंमत सुमारे 82,000 रुपये असेल असा अंदाज आहे.