Highway (Photo Credits-Wikipedia)

महाराष्ट्रात बीएच किंवा भारत सीरिज (Bharat Series) अंतर्गत वाहन नोंदणी क्रमांक सोमवारी सुरू झाल्याचे राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जे वाहन मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतात अशांसाठी बीएच सिरीज नंबर प्लेट फायदेशीर ठरेलम, कारण यामुळे त्यांना अनेक नोंदणी समस्या टाळता येतील. वाहनांच्या नंबर प्लेटवर आपण अनेकदा राज्य कोडनुसार नोंदणी पाहतो. जसे महाराष्ट्रसाठी एमएच (MH) हा कोड आहे. परंतु BH मालिकेतील वाहनांचे क्रमांक BH ने सुरू होतील. त्याचा कोणत्याही राज्याशी संबंध नसेल. ही नोंदणी संपूर्ण देशासाठी एक असेल.

मोटार वाहन कायदा 1988 नुसार, एका राज्यातील नोंदणीकृत वाहन 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी दुसर्‍या राज्यात ठेवल्यास त्याची नवीन नोंदणी करावी लागते. ही प्रक्रिया अतिशय किचकट व फार मोठी आहे. गेले अनेक दिवस याबाबत वाहन मालकांच्या तक्रारी येत होत्या, अखेर त्यावर केंद्राने उपाय शोधत बीएच सिरीज सुरु केली. आता यामुळे वाहन मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यानंतर त्याच्या वाहनावर बीएच सिरीजचे हे नोंदणी चिन्ह असल्यास, त्याला नवीन नोंदणी चिन्हाची आवश्यकता भासणार नाही. (हेही वाचा: Revolt RV400 ई-बाईक ची बुकिंग आजपासून सुरु; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

सतेज पाटील म्हणाले की, 'महाराष्ट्रात आजपासून बीएच मालिकेची नोंदणी सुरू झाली असून लोकांना आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणे सुकर झाले आहे. आता तुम्ही सर्वजण दिवाळीपूर्वी तुमच्या कारची डिलिव्हरी आनंदाने घेऊ शकता आणि कोणत्याही त्रासाशिवाय एका राज्यातून दुसर्‍या राज्यात लाँग ड्राईव्हचा आनंद घेऊ शकता.' नवीन नोंदणी पद्धत डिजिटल पद्धतीने होणार आहे. या नंबर प्लेटचे स्वरूप YY BH असेल.