US: अमेरिकेत यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या निक्की हॅली यांना मोठे यश मिळाले आहे. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत राष्ट्रपतीपदाच्या दावेदार निक्की हॅलीने विजय मिळवला आहे. आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा पिछाडीवर असलेल्या हॅलीने प्राथमिक फेरीत पहिला विजय मिळवले आहे. रिपब्लिकन उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (वॉशिंग्टन डीसी) च्या प्राथमिक निवडणुकीत निक्की हॅली यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे.
रविवारी हॅली यांच्या विजयाने ट्रम्प यांच्या विजयाची दौड तात्पुरती थांबली आहे, परंतु माजी राष्ट्राध्यक्षांना या आठवड्यातील 'सुपर ट्युजडे' (ग्रेट मंगळवार) मध्ये मोठ्या संख्येने प्रतिनिधींचा (मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष सदस्य) पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
'सुपर मंगळवार' हा अमेरिकेच्या अध्यक्षीय उमेदवारांची निवड करण्यासाठी प्राथमिक निवडणूक प्रक्रियेचा दिवस आहे, जेव्हा बहुतेक राज्यांमध्ये प्राथमिक आणि कॉकस निवडणुका होतात. गेल्या आठवड्यात गृहराज्य दक्षिण कॅरोलिनामध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी, हॅलीने आपण उमेदवारी सोडणार नसल्याचे सांगितले होते.
डीसी. रिपब्लिकन पक्षाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी हॅली यांना विजयी घोषित केले. तत्पूर्वी, ट्रम्प यांनी शनिवारी आयडाहो आणि मिसूरी येथे कॉकस जिंकले होते आणि मिशिगनमधील रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात त्यांना सर्वांचा पाठिंबा मिळाला होता.